भुसावळ । शहरात 25 वर्षानंतर प्रथमच कान्हदेश संगीत संमेलन शनिवार 14 रोजी सुरु झाले. सकाळी 9 वाजता कुळकर्णी प्लॉट येथे गणपती मंदिरापासून ते प्रभाकर हॉलपर्यंत नाद दिंडी काढून या संमेलनाची सुरुवात झाली. या नाद दिंडीत भजनी मंडळ तसेच जेष्ठ गायकांच्या प्रतिमा घेवून विद्यार्थी सहभागी झाले होते.
या दोन दिवसीय संगीत संमेलनाचे अध्यक्ष मुंबई येथील पं. चंद्रशेखर ओझे हे असून त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या संमेलनाचे उद्घाटन आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, नगरसेवक प्रमोद नेमाडे, चेतन पाटील, सुहास पाटील, डॉ. आर्विकर, प्रा. कुणाल पाटील, प्रा. उत्कर्षा, स्वरनिनादचे अध्यक्ष दिपक अडावदकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. पहिल्या सत्रात नाशिक येथील पं. सचिन चंद्रात्रे यांनी व्हाईस कल्चर यावर मार्गदर्शन करताना आवाज लावण्याचे प्रकार, आकार, उकार, रियाज करण्याची पध्दत यावर मार्गदर्शन करण्यात आले. हे चर्चासत्र सुमारे दोन तास चालले.