भुसावळ : कोरोनाला हरवल्यानंतर 45 वर्षीय इसमाने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना जामनेर रोडवरील केशर नगरात रविवारी सकाळी पाच ते साडेपाच दरम्यान घडली. चंदन बनारसदास खत्री (45, जामनेर रोडवर, केशर नगर) असे मयताचे नाव आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. आत्महत्येचे ठोस कारण मात्र कळू शकले नाही. खत्री यांना कोरोना झाल्यानंतर त्यांच्यावर 30 मार्च ते 8 एप्रिल याकाळात उपचार करण्यात आले व डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते भुसावळात आले. त्यानंतर त्यांना पुन्हा कोरोना होवून 15 एप्रिलला उपचारासाठी दाखल होवून ते 18 एप्रिलला पुन्हा बरे वाटल्याने घरी सोडण्यात आले. घरीच आराम करण्याचा सल्लाही देण्यात आला. असे असताना रविवारी त्यांच्या राहत्या घरात बेडरूममधील छताला लावलेल्या फॅनला ओढणी बांधून गळफास घेत आत्महत्या केली. संतोष बनारसदास खत्री यांनी दिलेल्या माहितीवरून बाजारपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
मृत्यूपूर्वी चिठ्ठी लिहिल्याची चर्चा
सूत्रांच्या माहितीनुसार, मयत खत्री यांनी शहरातील एका हॉटेल व्यावसायीकाला लाखोंची रक्कम दिली असून त्याबाबत चिठ्ठीत उल्लेख केला आहे. बाजारपेठ पोलिसांनी ही चिठ्ठी जप्त केली आहे. मयताने ही चिठ्ठी लिहिली वा नाही? ही बाब तपासात निष्पन्न होणार आहे. सहा.निरीक्षक भोये यांनी चिठ्ठी सापडल्याच्या वृत्ताला दुजोरा देत नातेवाईकांनी ती दिल्याचे सांगत हा तपासाचा भाग असल्याचे सांगितले. हवालदार सुनील जोशी पुढील तपास करीत आहे.