खुनानंतर पसार झालेल्या आरोपीच्या सतना येथून आवळल्या मुसक्या
भुसावळ- शहरातील अकबर टॉकीज परीसरातील 60 वर्षीय बेपत्ता वृद्धेचा अनैतिक संबंधातून खून झाल्याची बाब उघड झाली आहे. खुनानंतर भुसावळातील आरोपी मध्यप्रदेशातील सतना येथे सासूकडे आश्रयाला असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याच्या शहर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. अजीज खाटीक (42, अकबर टॉकीज परीसर, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. वृद्धेचा नेमका खून का करण्यात आला? ही बाब आरोपीच्या पोलिस कोठडीतील चौकशीनंतर स्पष्ट होणार आहे. शहर पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
भुसावळात खुनांचे सत्र
शहरातील सरला अशोक भांडारकर (60, रा.अकबर टॉकीज परीसर, भुसावळ) या गुरुवारपासून बेपत्ता असल्याने त्यांचा शोध सुरू होता तर रविवारी सकाळी हात नसलेल्या अवस्थेतील त्यांचा मृतदेह रेल्वेच्या झेडआरटीआय परीसरात रविवारी सकाळी आढळल्याने शहरात मोठी खळबळ उडाली होती. सुरुवातीला या वृद्धेचा खून करण्यात आला की अन्य कारणाने तिचा मृत्यू झाला? याबाबत ठोस कारण कळू स्पष्ट झालेले नव्हते मात्र वैद्यकीय पथकाने जागेवरच या महिलेचे शवविच्छेदन केल्यानंतर तिच्या डोक्यावर वजनदार वस्तूने प्रहार केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांच्या तपासाची दिशा बदलली. मयताच्या सूनेने सासूचे अनैतिक संबंध असल्याची माहिती शहर पोलिसांनी दिल्यानंतर त्या अँगलने पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर 11 रोजी वृद्धेचा खून झाल्याची माहिती पुढे आली.
अनैतिक संबंधातून वृद्धेचा खून
पतीच्या मृत्यूनंतर आपल्या 37 वर्षीय मतिमंद मुलगी सारीकासह सरला भांडारकर या अकबर टॉकीज भागात भाडे तत्वावरील घरात वास्तव्यास होत्या व काही महिन्यांपासून त्यांचे याच भागातील रहिवासी असलेल्या 42 वर्षीय अजीज खाटीकसोबत अनैतिक संबंध असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे मात्र उभयंतांमध्ये कुठल्यातरी कारणातून खटके उडाल्याने गुरूवार, 11 रोजी या संशयीताने वृद्धेला रेल्वेच्या झेडआरटीआय भागात नेले व तेथे त्यांचा खून करण्यात आला असावा? अशी शक्यता आहे.
आरोपीच्या सतन्यातून आवळल्या मुसक्या
संशयीत आरोपी अजीज हा खुन केल्यानंतर मध्यप्रदेशातील सतना येथे आपल्या सासूकडे लपून बसल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली रवाना झालेल्या बंटी सैंदाणे, शंकर पाटील, संजय बडगुजर व भूषण चौधरी आदींच्या पथकाने सोमवारी रात्री उशिरा त्याच्या मुसक्या आवळल्या. हे पथक बायरोड रवाना झाल्यानंतर मंगळवारी ते भुसावळात परतल्यानंतर आरोपीस न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.