भुसावळ आगाराच्या दोन बसेसवर अज्ञातांची दगडफेक
अखेर पोलीस बंदोबस्तात प्रवाशांची वाहतूक : अज्ञातांविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल
भुसावळ : तब्बल 20 दिवसानंतर एस.टी.संपाचा तिढा सुटला नसताना आठ कर्मचार्यांना सेवा समाप्तीची नोटीस बजावण्यात आल्यानंतर सहा कर्मचारी कामावर हजर झाले. भुसावळ-बोदवड व भुसावळ-यावल मार्गावर बसेस रवाना करण्यात आल्यानंतर अज्ञातांनी बसेसवर दगडफेक केल्याने बसच्या काचा फुटल्याने प्रवाशांच्या गोटात थरकाप उडाला. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पोलिसांनी या गंभीर घटनेनंतर एस.टी.बसेसला संरक्षण दिल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला. पोलिसांकडून दगडफेक करणार्यांचा आता शोध सुरू करण्यात आला आहे.
अज्ञातांनी बसच्या काचा फोडल्या
8 नोव्हेबरपासून एस.टी.कर्मचार्यांचा एस.टी.मंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करण्यासाठी बेमुदत संप सुरू आहे. संपाचा शनिवारी 20 वा दिवस महामंडळाचे सहा संपकरी कर्मचारी सेवा समाप्तीची नोटीस मिळताच कामावर रूजू झाले. भुसावळ आगारातून जळगाव, बोदवड आणि यावल या मार्गावर तीन बसेस सोडण्यात आल्यात मात्र भुसावळ-बोदवड बस (क्रमांक एम.एच.20 बी.एल.947) ही दीपनगर प्रकल्पाजवळ आली असता दुचाकीवरून आलेल्या चौघांनी महामंडळाच्या बसवर दगडफेक केली. दगडफेकीनंतर हल्लेखोर दुचाकीवरून पसार झाले. त्यानंतर बस दीपनगर येथून पोलिस बंदोबस्तात वरणगावपर्यत सोडण्यात आली. तेथून ही गाडी परत भुसावळात आली. त्यानंतर भुसावळ-यावल बस (क्रमांक एम.एच.20 बी.ई.2668) हिच्यावर परतीच्या प्रवासात पाटाच्या चारीजवळया गाडीवर अज्ञात लोकांनी दगडफेक केली. यात गाडीचा काच फुटला नाह, मात्र बसच्या मागील पत्र्याला दगड लागल्याने नुकसान झाले.
बंदोबस्तात सोडल्या बसेस
बसेसवर होत असलेल्या दगडफेकीनंतर बाजारपेठ पोलिसांनी बसेसला बंदोबस्त पुरवला. जळगाव येथे जाणार्या बससोबत बाजारपेठ पोलिस ठाण्याचे वाहन पाठवण्यात आले. त्यात सहा. पोलिस निरीक्षक मंगेश गोंटला, सहायक फौजदार तस्लीम पठाण यांच्यासह पोलिस कर्मचार्यांनी बंदोबस्त राखला. तिन्ही बसच्या एक-एकच फेर्या झाल्यात. जळगाव बसवर कुठेही दगडफेक झाली नाही.