भुसावळ आयुध निर्माणीने वर्षभरात गाठले 160 कोटींचे उद्दीष्ट

0

भुसावळ । भुसावळ आयुध निर्माणीने चालू आर्थिक वर्ष 2016-17 मध्ये विविध पॅकेजिंग बॉक्ससह पिनाका पॉड निर्मीतीचे लक्ष्य पुर्ण होत आहे. या वर्षात 75 पिनाका पॉड चे उद्दीष्ठ असून यात 72 पिनाका पॉड पुर्ण करण्यात आले आहे. हे उद्दीष्ठ पुढील आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये वाढून 150 तसेच 2018-19 मध्ये 450 पर्यंत घेऊन जाण्याचे नियोजन आहे. फेब्रुवारी 2017 मध्ये 160 कोटींचे उद्दीष्ठ निर्माणीने पुर्ण केले असून मार्च 2017 पर्यंत 175 कोटी रुपयांचे उत्पादन मिळणार आहे.

आयुध निर्माणी स्थापनादिनानिमित्त विविध कार्यक्रम
गेल्या वर्षाच्या तुलनेत उत्पन्नात 28 टक्क्यांनी वाढ झाली असल्याची माहिती आयुध निर्माणीचे प्रभारी अधिकारी सोमनाथ त्रिपाटी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. याप्रसंगी एजीएम एस.बी. पाटील, संयुक्त महाप्रबंधक टी.बी. देशमुख, एडब्ल्युएम ए.के. देशमुख आदी अधिकारी उपस्थित होते. यावेळी माहिती देताना त्रिपाटी म्हणाले की, शनिवार 18 रोजी आयुध निर्माणी दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात कर्मचार्‍यांचा गौरव करण्यात येऊन पारिवारिक भेटींचे आयोजन करण्यात आले आहे.

पिनाका पॉड असेंब्ली उत्पादनाची जबाबदारी
भुसावळ आयुध निर्माणीला सुरक्षा उत्पादनांची पॅकेजिंग बनविणार्‍या निर्माणीच्या अग्रणी म्हणून पाहिले जाते. यात सशस्त्र दलांना लागणारे विविध प्रकारचे लहान आणि मध्यम आकाराचे युध्दोपकरणासाठी बॉक्स, कॅरियर, सिलींडर, ड्रम, बॅरलचे उत्पादन करण्यात येत असते. याव्यतिरीक्त कोलकत्ता बोर्डाने भुसावळ आयुध निर्माणीवर विश्‍वास दाखवून मल्टी बॅरल, रॉकेट लाँचर प्रणालीची उपप्रणाली पिनाका पॉड असेंबली उत्पादनाची जबाबदारी देण्यात आली आहे.

ठाकूर यांचा सत्कार
कोलकत्ता आयुध निर्माणी बोर्डाने सुरक्षा क्षेत्रात भुसावळ आयुध निर्माणीच्या कार्याची दखल घेत महाप्रबंधक रणजीत सिंह ठाकुर यांना 2016 चा आयुध भुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यासंदर्भात आयुध निर्माणी बोर्डाचे महानिर्देशक व अध्यक्ष एस.सी. वाजपेयी यांच्या हस्ते आयुध भूषण पुरस्कार देण्यात आला. रणजित सिंह ठाकूर यांनी जून 2015 ला भुसावळ आयुध निर्माणीत महाप्रबंधक म्हणून पदभार घेतला. त्यांनी 18 महिन्यांच्या कार्यकाळात निर्माणीच्या सर्व क्षेत्रात संपुर्ण संवर्धन केले आहे. तसेच प्रबंधनाच्या काही क्षेत्रात इतिहास निर्माण केला आहे. 2014-15 मध्ये 13.5 करोड, 2015-16 मध्ये 5.16 करोड अधिकचे उत्पन्न केले. त्यांनी युध्द साहित्यासाठी स्टील पॅकेजिंग बॉक्स सह पिनाका पॉडचे उत्पादनही केले. नोव्हेंबर 2016 पर्यंत 40 पिनाका पॉड चे उत्पादन करण्यात आले. तसेच वेळेच्या आत 75 पिनाका पॉडचे उत्पादन करण्यात येणार असून पुढील वर्षी 150 पिनाका पॉडचे लक्ष्य पुर्ण केले जाईल.