भुसावळ आयुध निर्माणी कामगार युनियनचे आंदोलन आश्‍वासनानंतर अखेर मागे

0

भुसावळ- विविध मागण्यांसाठी आयुध निर्माणी कामगार युनियनतर्फे गेल्या 17 दिवसांपासून उपोषण सुरू होते तर शुक्रवारी आयुध निर्माणी प्रशासनाने मागण्यांबाबत सकारात्मकता दर्शवल्याने उपोषण मागे घेण्यात आले. आयुध निर्माणीतील कर्मचार्‍यांनी प्रशासनाविरूद्ध 9 जुलैपासून साखळी उपोषण सुरू होते. महाप्रबंधकांनी लक्ष घालून कामगारांना न्याय मिळवून द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होती. गेल्या 17 दिवसांच्या काळात आंदोलनाची दखल घेतली न गेल्याने आगामी काळात आंदोलनाची धार तीव्र केली जाईल, असा इशारा उपोषणार्थींनी दिला होता तर या आंदोलनास आयुध निर्माणीतील एससी-एसटी, ओबीसी संघटनांनी पाठिंबा दिला. शुक्रवारी प्रशासकीय अधिकारी ए.के.देशमुुख, वर्क्स मॅनेजर एन.एस.सय्यद यांनी आंदोलकांसोबत चर्चा केली. मागण्यांबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन अधिकार्‍यांनी दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

ओव्हरटाईम देण्याचे आश्‍वासन
वर्क लोड वाढल्यानंतर एकसमान ओव्हरटाईम दिला जाईल, अशी ग्वाही अधिकार्‍यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. शुक्रवारी रवींद्र साखळकर, प्रमोद तायडे, पंकज बडगुजर, राजेश भोळे साखळ उपोषणाला बसले होते. एआयडीईएफचे महासचिव सी.श्रीकुमार, उपाध्यक्ष राजेंद्र झा यांनी मार्गदर्शन केले. तसेच महाप्रबंधकांसोबत दूरध्वनीवर चर्चा केली. युनियनचे महासचिव दिनेश राजगिरे, दीपक भिडे, प्रवीण मोरे, किशोर बढे, मिलेश देवराळे, किशोर पाटील, आर.एन.जैन, विजय साळुंखे, सूर्यभान गाढे, विनोद तायडे आदी उपस्थित होते.