भुसावळ ऑर्डनन्समध्ये गाईडेड पिनाका लाँचर पॉडचे उत्पादन
75 किलोमीटरपर्यंत लक्षाचा अचूक मारा : पोखरणमध्ये होणार चाचणी
भुसावळ : भुसावळातील ऑर्डनन्स फॅक्टरीने 35, 45 नंतर 75 किलोमीटर अंतरावरील लक्षावर अचूक मारा करणार्या चार गाईडेड पिनाका लाँचर पॉडचे यशस्वी उत्पादन केले आहे. यंत्र इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष तथा महासंचालक राजीव पुरी यांच्या हस्ते या गाईडेड पिनाका लाँचर पॉडच्या उत्पादनाला हिरवा झेंडा दाखवून ते अंबाझरी येथील आयुध निर्माणीत पाठविण्यात आले. अंबाझरी येथे या पॉडमध्ये सर्किट बसवल्यानंतर त्याची पोखरणमध्ये चाचणी घेतली जाणार आहे.
75 किलोमीटरपर्यंत मारक क्षमता
भुसावळातील ऑर्डनन्स फॅक्टरी, यंत्र इंडिया प्रॉयव्हेट लिमिटेड भुसावळ येथे गाइडेड पिनाका लाँचर पॉडचे उत्पादन केले जात असून त्याची रेंज 75 किमी पर्यंत आहे. या पिनाका पॉडमुळे भारतीय लष्कराची ताकद वाढणार आहे. यंत्र इंडियाचे अध्यक्ष तथा महासंचालक राजीव पुरी यांच्या हस्ते या पॉडच्या वाहनाला हिरवा झेंडा दाखवून ते अंबाझरी येथे रवाना करण्यात आले. यावेळी आयुध निर्माणी भुसावळचे महाव्यवस्थापक अनुराग एस. भटनागर सर्व अधिकारी, सर्व यूनियन व असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
165 कोटींच्या उत्पादनाचे उद्दिष्ट
आयुध निर्माणी भुसावळचे 2022-2023 चे वार्षिक उत्पादन उद्दीष्ट 165 कोटी आहे. या उद्दीष्ठाची पूर्तता करण्यासाठी प्रत्येकाने आपली कामे कठोर परीश्रम घेवून व दर्जेदारपणे उत्पादीत करावी. उत्पादनाचे उद्दीष्ट कसे गाठता येईल, यासाठी प्रयत्न करावे. पिनाका पॉडचे यशस्वी उत्पादन ही भुसावळ आयुध निर्माणीचा सन्मान वाढविणारी बाब असल्याचे राजीव पुरी म्हणाले.