खंडित वीजपुरवठ्याचा फटका ; दीपनगर 11 केव्हीच्या ब्रेकरमध्ये बिघाड
भुसावळ- भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरीत खंडित वीजपुरवठ्यामुळे मंगळवारी दिवसभर कामकाज बंद करण्याची वेळ प्रशासनावर ओढवली. दीपनगर 132 केव्ही महापारेषण केंद्रातून 11 केव्ही वाहिनीव्दारे आयुध निर्माणीला स्वतंत्रपणे वीजपुरवठा होतो मात्र मंगळवारी पहाटे चार वाजेच्या दरम्यान या वाहिनीवरील ब्रेकरमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने वीजपुरवठा खंडीत झाला. खंडीत वीजपुरवठ्यामुळे कामकाज होऊ शकत नसल्याने आयुध निर्माणी प्रशासनाने कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. यामुळे सकाळी सात वाजेची शिप्ट बंद ठेवण्यात आली. याबाबतची माहिती नसल्याने बहुतांश कर्मचारी कामावर आले मात्र काम बंदच्या निर्णयामुळे त्यांना माघारी फिरावे लागले. दरम्यान महावितरण, महापारेषण कंपनीने दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. सकाळी 11 केव्ही वाहिनीचा लोड फुलगाव वाहिनीवर देवून आयुध निर्माणीचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरुपात कार्यान्वित करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. पुरवठ्यामुळे केवळ पाणीपुरवठा, एफबी, सुरक्षा, एटीएम, हॉस्पीटल आदींमध्ये विजेचा वापर करण्यात आला.