भुसावळ गटसाधन केंद्र कार्यालयाने टाकली कात

0

भुसावळ। बेरंग भिंती व निरस वातावरण असलेले भुसावळ गटसाधन केंद्र कार्यालयाने कात टाकली असून येथे शालेय पोषण आहार, गटसमन्वय कार्यालय व गटशिक्षणाधिकारी कार्यालयास रंगरंगोटी करण्यात आली आहे. कोणताही गाजावाजा न करता शालेय पोषण आहार अधिक्षक सुमित्र अहिरे यांनी या बेरंग कार्यालयाचे चित्र बदलविण्याचे ठरवले. एकीकडे शाळा डिजीटल होत असताना या कार्यालयास रंगरंगोटी नसल्यामुळे कार्यालयाची ‘शोभा’ होत आहे हे त्यांना खटकले.

बेटी बचाओ बेटी पढाओचा संदेश
शालेय पोषण आहार कार्यालय हे नुसते नावाला होते. अहिरे यांनी सहकारी अधिकारी व कर्मचार्‍यांच्या सहकार्याने शालेय पोषण आहार कार्यालयाचे नुतनीकरण केले. आता या कार्यालयास भेट देणार्‍या शिक्षकांमध्ये समाधान जाणवत आहे. तसेच हीच अवस्था गटसमन्वय कार्यालयाची होती. शिक्षण विस्तार अधिकारी रागिणी चव्हाण यांनी शालेय पोषण आहार अधिक्षक अहिरे यांच्या कार्याची प्रेरणा घेत कार्यालयाचे चित्र बदलविले. कार्यालयास रंगरंगोटी करुन बेटी बचाओ बेटी पढोओचा संदेश देण्यात आला. त्यांच्या प्रयत्नातून गटशिक्षणाधिकारी कार्यालयाचीसुद्धा रंगरंगोटी करण्यात आली.

शंभर टक्के डिजीटल
शिक्षण विस्तार अधिकारी रागिणी चव्हाण यांच्या कार्यक्षेत्रातील बीट क्रमांक 2 मधील सर्व शाळा शंभर टक्के डिजीटल झाल्या आहेत. चव्हाण यांच्या प्रयत्नातून तालुक्यात पहिली डिजीटल क्लासरुम विल्हाळे जिल्हा परिषद शाळेत सुरु झाली. विल्हाळे शाळेच्या डिजीटल वर्गासाठी स्वत: चव्हाण यांनी पदरमोड करत 10 हजारांची मदत केली होती. तसेच ग्रामस्थांनासुद्धा सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन बीट मधील सर्व शाळा या डिजीटल झाल्या आहेत.

‘कॉफी विथ सीईओ’ या उपक्रमामुळे कार्यालयाचे निरस चित्र बदलविण्यासाठी प्रेरणा मिळाल्याचे शालेय पोषण आहार अधिक्षक सुमित्र अहिरे यांनी सांगितले. तत्कालीन सीईओ अस्तिककुमार पांडेय यांचे मार्गदर्शन लाभल्याचे ते म्हणाले.