भुसावळ- हॉटेलवरून उठ म्हटल्याचा राग येवून शहरातील ठाकूर भावंडावर 12 आरोपींनी चाकू हल्ला करीत मारहाण केल्याची घटना सोमवारी रात्री 10 वाजता जामनेर रोडवर घडली होती. या प्रकरणी मुख्य आरोपी भागवत सावकारे याच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेला चाकू जप्त करण्यात आला. बुधवारी 12 संशयीतांची वैद्यकीय तपासणी जिल्हा रुग्णालयात करण्यात आली. सोमवारी रात्री 10 वाजता जामनेर रोडवरील दिलीप ठाकूर त्यांचे कुणाल बिअर शॉपी हे दुकान बंद करीत असतांना भागवत सावकारे व त्याचे सहकारी तेथे आले ते दुकानात खुर्चीवर बसले असता त्यांना नितीन ठाकूर यांनी दुकान बंद करायचे आहे, असे सांगितल्याचा सावकारेंना राग आल्याने त्यांनी ठाकूर यांना शिवीगाळ केली तर त्यांच्या सोबत असलेल्यांनी त्यांना मारहाण केली. तसेच भागवत सावकारे यांनी निनीन ठाकूर यांच्या मानेवर चाकूने वार करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी ठाकूर व त्यांचे सहकारी बाजारपेठ पोलिस ठाण्यात आले असता, त्यांच्या मागेही 8 ते 10 जण आले त्यांनी पोलिस ठाण्याच्या परिसरात मारहाण केली होती. या प्रकरणात सावकारे यांनी वापरलेला चाकू पोलिस निरीक्षक देवीदास पवार, उपनिरीक्षक अनीश शेख यांनी वाल्मीक नगरजवळील नाल्याजवळून जप्त केला. या प्रकरणातील अजून लोखंडी पाईप, काठ्यांचाही वापर करण्यात आला होता. त्याही जप्त केल्या जाणार आहे. त्या दृष्टीने पोलिस तपास करीत आहे.