लोहमार्ग ठाण्यासमोर चौथर्याचे बांधकाम : सेल्फी पॉईंट प्रवाशांचे आकर्षण
भुसावळ- रेल्वेचे जंक्शन असलेल्या भुसावळ शहरात रेल्वे स्थानक परीसराच्या सौंदर्यीकरण कामाला सुरुवात झाली आहे. दक्षिणेकडील प्रवेशद्वारासमोर खडकी (पुणे) मिलीटरी कॅम्पमधील रणगाडा ठेवला जाणार आहे. त्यासाठी जीआरपी पोलिस ठाण्याच्या समोर चौथर्याचे बांधकाम केले जात आहे. मध्य रेल्वेच्या पाचही विभागांमध्ये असा उपक्रम सर्वप्रथम भुसावळ जंक्शनवर राबवला जात आहे. जंक्शनच्या दक्षिण प्रवेशद्वारासमोर काँक्रिटीकरण केले जात असून बसस्थानकाचा मार्ग बंद करण्यात आला आहे. र दक्षिण प्रवेशद्वाराकडे उद्यानाची निर्मिती केली जाणार असून उद्यानाच्या बाहेर चौथर्यावर रणगाडा ठेवला जाणार आहे. त्या दृष्टीने चौथर्याचे काम 15 दिवसात पूर्ण केले जाणार आहे.
सेल्फी पॉइंटचे आकर्षण
रणगाड्यासोबत प्रवाशांना सेल्फी घेण्यासाठी रेल्वे प्रशासनातर्फे सेल्फी पॉइंटची व्यवस्था केली जाणार आहे. 15 ऑगस्टपर्यंत जीआरपी पोलिस ठाण्याचे स्थलांतर होणार असून त्यानंतर या ठिकाणी उद्यानाच्या कामाला गती दिली जाणार आहे, अशी माहिती डीआरएम आर.के.यादव यांनी दिली.