स्वच्छतेसह विद्युत पुरवठा करण्याच्या किशोरराजे निंबाळकरांच्या सूचना
भुसावळ- रावेर लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी कर्नाटकातून पाच हजार ईव्हीएम मशीन आठवडाभरात भुसावळातील शासकीय गोदामात ठेवण्यात येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी शनिवारी सकाळी भुसावळ शहरातील यावल रोडवरील शासकीय गोदामाची पाहणी केली. गोदामाची स्वच्छता करण्यासह तातडीने इलेक्ट्रीक फिटींगची कामे करून घ्यावी तसेच वीज मीटर बसवून घेण्याचे आदेश त्यांनी दिली. याप्रसंगी निंबाळकर यांनी शहरातील टेक्नीकल हायस्कूलजवळील प्रशासकीय ईमारतीची पाहणी केली. प्रसंगी प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर, प्रभारी तहसीलदार संजय तायडे, सार्वजनिक बांधकाम अभियंता एस.यु.कुरेशी यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
आठवडाभरात दाखल होणार ईव्हीएम मशीन
रावेर लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी आठवडाभरात पाच हजार ईव्हीएम शहरातील शासकीय गोदामात ठेवण्यात येणार असून त्या संदर्भात प्रशासनाची तयारी सुरू आहे. ईव्हीएम ठेवण्यासाठी निवडणूक विभागाच्या अधिकारी व प्रभारी तहसीलदार संजय तायडे यांनी गोदामाची पाहणी केली होती तर शनिवारी जिल्हाधिकार्यांनी देखील भेट देऊन जागेची पाहणी करीत काही सूचना केल्या. धान्य गोदामाची पाहणी करून तेथील गोदामही उपलब्ध होवू शकते का? याबाबत त्यांनी विचारणा केली. रावेर मतदार संघात चोपडा, यावल, रावेर, बोदवड, मुक्ताईनगर, भुसावळ, मलकापूर, जामनेर, नांदूरा व पाचोरा तालुक्याचा काही भाग समाविष्ट होतो. या भागांतील प्रत्येक मतदान केंद्रावर कर्नाटकातून येणार्या ईव्हीएमचा वापर केला जाणार असून वरीष्ठांच्या मार्गदर्शनानुसार तपासणी करून पुर्वीचा डाटा निकामी केला जाईल. मशीन अद्ययावत केल्यानंतर त्यांचा वापर केला जाणार असल्याचे प्रभारी तहसीलदार तायडे म्हणाले. ईव्हीएम सुरक्षेसाठी 24 तास सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे.