भुसावळ तालुक्यातील पाच हजार विद्यार्थ्यांना मिळणार शालेय गणवेश

0

गणवेश खरेदीचे पक्के बिल सादर केल्यानंतरच पालकांना मिळणार गणवेशाची रक्कम

भुसावळ (प्रतिनिधी)- सर्व शिक्षा अभियानातून विद्यार्थ्यांना दोन शालेय गणवेशासाठी आतापर्यंत 400 रूपये दिले जात होते अल्प रकमेत दोन गणवेश बसणार कसे? याबाबत ओरड होत असल्याने यंदाच्या वर्षापासून शिक्षण विभागाने दोन शालेय गणवेशाच्या निधीत 200 रूपयाची वाढ केल्याने प्रत्येक विद्यार्थ्याला दोन गणवेशासाठी 600 रूपये मिळणार आहेत. याचा तालुक्यातील पाच हजार 306 विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे.

पालकांनी स्व-खर्चातून करावी लागणार गणवेश खरेदी
सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान व शिक्षकांचे शिक्षण या तीन केंद्र पुरस्कृत तीन योजनांचे एकत्रीकरण करून 2018-19 या आर्थिक वर्षात समग्र शिक्षा अभियान ही नवीन योजना सुरू केली आहे. योजनेतून पहिली ते आठवीच्या सर्व शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील सर्व मुले-मुली अनुसूचित जाती-जमातीची मुले आणि दारीद्रय रेषेखालील मुलांना मोफत शालेय गणवेश या योजनेतून खरेदीसाठी 600 रूपये दिले जाणार आहेत. योजनेतंर्गत भुसावळ तालुक्यातील सर्व शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील सर्व मुले-मुली अनुसूचित जाती-जमातीची मुले आणि दारीद्रय रेषेखालील अशा पाच हजार 306 विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. शालेय गणवेशाची रक्कम पालकांच्या बँकेतील खात्यावर जमा होणार आहे मात्र पालकांना आधी स्वखर्चातून आपल्या पाल्याला शालेय गणवेश खरेदी करावा लागणार आहे. शालेय गणवेशाची रक्कम जुलै महिन्यात पालकांच्या खात्यावर वर्ग होण्याची शक्यता शिक्षण विभागाने वर्तवली आहे.

गणवेशाचा घोटाळा थांबण्यास होईल मदत
सर्व शिक्षा अभियानातंर्गत पुर्वी शालेय गणवेशाचे वितरण केले जात होते मात्र वितरण केला जाणारा गणवेश विद्यार्थ्यांच्या मापात येत नसे याममुळे विद्यार्थी व पालकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात होती तसेच या शालेय गणवेश वितरणात भुसावळातील घोटाळा उघड होवून गटशिक्षणाधिकारी यांच्यावर गुन्हादेखील झाल्याने शासनाने शालेय गणवेशाची रक्कम थेट पालकांच्या खात्यावर वर्ग करण्याचा निर्णय घेतला असल्याने शालेय गणवेश घोटाळा थांबण्यास मदत होणार आहे.

पावती करावी लागणार सादर
विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या पाल्यास शालेय गणवेश खरेदी केल्याची पावती सादर करणे बंधनकारक आहे. पावती सादर केल्यानंतरच पालकांच्या बँकेतील खात्यावर शिक्षण विभागाकडून रक्कम वर्ग केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.