भुसावळ ते जळगाव लाँग मार्च रद्द ; पुर्नवसनाचा चेंडू जिल्हाधिकार्‍यांच्या कोर्टात

0

प्रांताधिकार्‍यांनी दिले मोर्चेकर्‍यांना पत्र ; दखल घेण्याची जिल्हाधिकार्‍यांनी विनंती

भुसावळ- शहरातील रेल्वे हद्दीतील झोपडपट्टी बचाव समर्थनार्थ सर्वपक्षीय पदाधिकारी शनिवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जेलभरो आंदोलन करणार होते मात्र प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर व प्रशासनातील अधिकार्‍यांशी मोर्चेकर्‍यांच्या शिष्टमंडळाने चर्चा केल्यानंतर प्रांताधिकार्‍यांनी झोपडपट्टी पुर्नवसनासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांना विनंती करणारे पत्र दिल्याने लाँगमार्च रद्द करण्यात आला. झोपडपट्टी पुर्नवसनाचा चेंडू आता जिल्हाधिकार्‍यांच्या कोर्टात असून याबाबत ते आता काय? निर्णय घेतात? याकडे झोपडपट्टी धारकांचे लक्ष लागले आहे.

झोपडपट्टीवासीयांच्या पुर्नवसनाची मागणी
रेल्वे प्रशासनाच्या हद्दीतील अतिक्रमित झोपड्या, टपर्‍या आदी अतिक्रमण काढण्याची मोहिम रेल्वे प्रशासनाने हाती घेतली असून या मोहिमेची रेल्वे प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे मात्र अतिक्रमण धारकांनी तीन वेळा न्यायालयात धाव घेवून अतिक्रमण हटवण्यास स्थगिती मिळवली आहे. शेवटच्या स्थगितीची मुदत 7 जूनपर्यंत आहे. यानंतर रेल्वे प्रशासन आपल्या निर्णयानुसार अतिक्रमण हटवण्याची मोहिम हाती घेणार असल्याने अनेकांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. याची सर्व पक्षीय पदाधिकार्‍यांनी दखल घेवून राज्य शासनाकडे पुर्नवसनाची मागणी करण्यासाठी शनिवारी भुसावळ ते जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर पायी काढण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार शनिवारी मोर्चेकरी शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर एकत्रित झाले मात्र यावेळी प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी मोर्चेकरांच्या मागण्या लक्षात घेता पुर्नवसनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठपुरावा करण्यात आला असल्याचे पत्र नायब तहसीलदार संजय तायडे, प्रांताधिकारी कार्यालयातील दिलीप बारी यांनी मोर्चाच्या प्रारंभी मोर्चेकरांना दिल्याने मोर्चा जागेवर स्थगित झाला. मोर्चात रेल्वेच्या अतिक्रमित भागातील महिला व पुरूषांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. यावेळी मोर्चाला पीआरपीचे जगन सोनवणे व राजु सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले.

अन्यथा करू किंवा मरू आंदोलन -जगन सोनवणे
शासनाने अतिक्रमण धारकांचे त्वरीत पुर्नवसन करण्याची प्रक्रिया राबवणे आवश्यक आहे. यामध्ये हलगर्जीपणा केल्यास 15 दिवसानंतर पुन्हा करू किंवा मरू अशा प्रकारचे आंदोलन केले जाणार आहे. खासदार रक्षा खडसे व आमदार संजय सावकारे यांचे गंभीर विषयाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत मजदूर सेनेचे प्रदेश महामंत्री जगन सोनवणे यांनी त्यांच्यावर चांगलीच आगपाखड केली.

तर पालकमंत्र्यांना घेराव -राजू सूर्यवंशी
शहराच्या विविध भागात शासकीय भुखंड असून या भुखंडावर शासनाने अतिक्रमीत झोपडपट्टी धारकांचे पुर्नवसन करण्याची मागणी वारंवार शासनाकडे करण्यात आली आहे. न्याय न मिळाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल, असा इशारा आरपीआय गवई गटाचे जिल्हाध्यक्ष राजु सूर्यवंशी यांनी दिला. जिल्ह्यात पालकमंत्री आल्यानंतर त्यांना घेराव घालण्याचा इशाराही त्यांनी दिला.

यांची होती उपस्थिती
मोर्चा यशस्वी करण्यासाठी जगन सोनवणे, राजू सुर्यवंशी, नगरसेविका पुष्पा सोनवणे, पूजा राजु सुर्यवंशी यांच्यासह सुदाम सोनवणे, मुन्ना सोनवणे, शरद सोनवणे, सिद्धार्थ सोनवणे, राजू तायडे, मनोहर सुरडकर यांच्यासह इतर पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.

पोलिसांचा चोख बंदोबस्त
भुसावळ ते जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर अतिक्रमण धारकांचा पुर्नवसनाच्या मागणीसाठी पायी मोर्चा निघणार होता. यासाठी शहर व बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शिवाय पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळेयांनी शुक्रवारी शहरातील बंदोबस्ताचा आढावा घेवून मोर्चेकर्‍यांशी संवाद साधला होता.

मोर्चेकर्‍यांना दिले पत्र
मजदूर सेनेचे प्रदेश महामंत्री जगन सोनवणे व आरपीआय गवई गटाचे जिल्हाध्यक्ष राजु सूर्यवंशी आदींनी प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांच्याशी शनिवारी दुपारी चर्चा केली. यावेळी चिंचकर यांनी झोपडपट्टी धारकांना सातबारा उतारा देण्यासह त्यांचे पुर्नवसन करण्यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांना 31 रोजी पाठवलेल्या पत्राची प्रत दिली. जिल्हाधिकार्‍यांनी या प्रश्‍नी आपल्या स्तरावरून दखल घ्यावी, असे पत्रात नमूद आहे त्यामुळे आता जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर काय निर्णय घेतात ? याकडे लक्ष लागले आहे.