खासदार रक्षा खडसे यांची माहिती ; डीआरएम प्रशासनाशी चर्चा
भुसावळ- गेल्या अनेक वर्षांपासून भुसावळ ते मुंबईसाठी स्वतंत्र एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी होत होती तर या मागणीसंदर्भात खासदार रक्षा खडसे यांनी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर 16 फेब्रुवारीपासून भुसावळ ते बांद्रा व्हाया नंदुरबार एक्स्प्रेस सुरू होत असल्याची माहिती खासदार रक्षा खडसे यांनी येथे दिली. गुरुवारी विविध प्रश्नांसंदर्भात खासदारांनी डीआरएम आर.के.यादव यांच्याशी चर्चा केली. यानंतर प्रसिद्धी माध्यमांना त्यांनी माहिती दिली.
‘राजधानी’ला भुसावळ थांबा देण्याची मागणी
खासदारांनी राजधानी एक्स्प्रेसला भुसावळ थांबा देण्याची मागणी केली तसेच रावेर तालुक्यातील निंभोरासह सावदा आदी स्थानकांवरील प्रश्नांबाबत चर्चा केली तसेच रेल्वे प्रशासनातर्फे सुरू असलेल्या विकासकामांबाबत चर्चा केली. पालिकेच्या अखत्यारीतील काही जागा रेल्वेकडे हस्तांतरीत करायच्या असल्याने नगरपालिका व रेल्वे प्रशासनाने एक कमेटी गठीत करण्याबाबत याप्रसंगी निर्णय झाला शिवाय चौथ्या बोगद्याबाबत तसेच पालिकेजवळून जाणारा रस्ता एकेरी करण्यासह अन्य मुद्यांवर चर्चा करण्यात आली. खासदार म्हणाल्या की, भुसावळ ते बांद्रा व्हाया नंदुरबार एक्स्प्रेस 16 रोजी बांद्रा येथून सुटणार असून परतीच्या प्रवासात ही गाडी 17 रोजी सायंकाळी सहा वाजता भुसावळ येथून सुटणार आहे. या संदर्भातील शेड्युल प्राप्त झाल्याचे त्या म्हणाल्या. याप्रसंगी नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्ष लक्ष्मी मकासरे, भाजपा संघटन सरचिटणीस प्रा.सुनील नेवे, रेल्वे सल्लागार समिती सदस्य अनिकेत पाटील, गोलू पाटील, रमेश मकासरे, देवा वाणी, पवनकुमार बुंदेले, शफी पहेलवान आदींची उपस्थिती होती.