भुसावळ दरोड्यातील आरोपींकडून चार लाखांची रोकड जप्त

0

भुसावळ- खंडवा येथील लाकडाचा व्यापारी शंकर पासी याच्याकडील पाच लाख रूपये लूटीतील आठ संशयीतांची पोलिस कोठडीची मुदत संपल्याने बाजारपेठ पोलिसांनी आठही संशयीतांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, आरोपींनी आतापर्यंत लुटीतील पाच पैकी चार लाखांची रोकड काढून दिली आहे. खंडव्याच्या लाकूड व्यापार्‍याला लुटून दरोड्याच्या उद्देशाने आलेल्या मध्यप्रदेशासह भुसावळ, अकोल्यातील आठ संशयीत दरोडेखोरांच्या बाजारपेठ पोलिसांनी अटक केली होती तर व्यापार्‍याला लूटल्याचा गुन्हा जीआरपी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

दरोड्याचा गुन्हा लोहमार्ग पोलिसात वर्ग
जीआरपी पोलिसांनी रविवारी न्यायालयात जात बाजारपेठ पोलिसांनी अटक केलेल्या आठही संशयीतांना त्यांच्या गुन्ह्यात वर्ग केले आहे. लूटीच्या तपासाला यामुळे वेग येणार आहे. जीआरपी पोलिसांनी डिगंबर वासुदेव कुचके (वय 42, रा.हाथा, ता.बाळापुर, जि.अकोला), संतोष सुकलाल करमा (वय 40, रा.सनावद, ता.बडवा, जि.खरगोन, मध्यप्रदेश), दिलीपसिंग नथ्थुसिंग चव्हाण (वय 40, रा.सनावद, ता.बडवा, जि.खरगोन, मध्यप्रदेश), नारायणसिंग गोकुळसिंग राजपुत (वय 44, रा.टोकसर, ता.बडवा, जि.खरगोन, मध्यप्रदेश), नाना जगन सोनी (वय 37, रा.सनावद, ता.बडवा, जि.खरगोन,मध्यप्रदेश), नंदलाल हरीप्रसाद विश्वकर्मा (वय 46, रा.खडका, ता.भुसावळ), डॉ. शेषराव पांडुरंग राठोड (वय 47, रा.शिरसोली, ता.तेल्हारा, जि.अकोला), अकबर उस्मान तंबोली (वय 35, रा.बिंदिया नगर, खडका, ता.भुसावळ) यांना त्यांच्या गुन्ह्यात वर्ग केले आहे. दरम्यान, या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी पोलिस निरीक्षक दिलीप गढरी यांना भ्रमणध्वनी लावला असता वारंवार नो रीप्लाय झाला.