कौल चोरीचा विरोधकांचा आरोप ; चौकशीकामी कंत्राटदारासह तिघे शहर पोलिसांच्या ताब्यात
भुसावळ- नगरपालिकेच्या यावल रोडवरील दवाखान्यातून जीर्ण कौलांची वाहतूक असल्याची माहिती मिळाल्यानंतर विरोधकांनी हा प्रकार हाणून पाडल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. या प्रकाराची माहिती शहर पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी कौलाची वाहतूक करणार्या ठेकेदारासह तीन जणांना चौकशीकामी ताब्यात घेतले असून वाहनही जप्त केले. विरोधकांनी पालिकेतील कौलांची चोरी करून परस्पर विक्री केली जात असल्याचा आरोप केला आहे तर पालिका प्रशासनाने मात्र ही कौले निरर्थक असल्याचे सांगत त्यांचे कुठलेही मूल्य नसल्याचा दावा केला आहे. या प्रकारानंतर सायंकाळी उशिरा मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर यांनी सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्याकडे बाजू मांडली. पोलिसांनी या प्रकरणी पालिकेकडून लेखी मागितले असून त्यानंतर गुन्हा दाखल करायचा अथवा नाही यावर निर्णय होणार आहे.
ठरावाविनाच स्क्रॅप विक्री हा तर चोरीचा प्रकार !
पालिकेतील विरोधी पक्षाचे गटनेता उल्हास पगारे, सचिन चौधरी, दुर्गेश ठाकूर, राहुल बोरसे आदींना पालिका दवाखान्यातील कौलांची परस्पर विल्हेवाट लावली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी धाव घेत ठेकेदाराला विचारणा केली. संबंधिताने आपल्याकडे कौल उचलण्याची कुठलीही ऑर्डर नसल्याचे सांगितले तर एका पदाधिकार्याच्या सांगण्यावरून आपण कौल नेत असल्याचे ठेकेदाराने सांगितले. स्क्रॅप विक्रीबाबत कुठलाही ठराव झाला नसल्याचा दावा करून हा प्रकार म्हणजे वरच्या-वर मलिदा खाण्याचा प्रकार असल्याचा दावा विरोधकांनी प्रसंगी केला. यावेळी शहर पोलिसांना माहिती दिल्यानंतर उपनिरीक्षक विशाल पाटील यांनी धाव घेत ठेकेदारासह वाहन ताब्यात घेऊन आयशर वाहन (एम.पी.09 जी.एफ.2818) ताब्यात घेतले. शिरवेल येथे या कौलांची वाहतूक होत असल्याचे सांगण्यात आले. तिघांना चौकशीसाठी शहर पोलीस ठाण्यात आणले. रात्री उशिरा तिघांकडून पोलिसांनी जवाब लिहून घेतले. मंगळवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास गाडीतील कौलासह जागेवर पडून असलेल्या कौलांचा पंचनामा करण्यात आला.
मुख्याधिकार्यांच्या मदतीला धावले सत्ताधारी
शहर पोलिसांनी नेमका प्रकार जाणून घेण्यासाठी मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर यांना कळवल्यानंतर ते शहर पोलीस ठाण्यात आले. यावेळी सत्ताधारी नगराध्यक्ष रमण भोळे, नगरसेवक प्रमोद नेमाडे, अॅड.बोधराज चौधरी, राजेंद्र नाटकर, पुरूषोत्तम नारखेडे., परीक्षीत बर्हाटे, वसंत पाटील, पुरूषोत्तम नारखेडे, देवा वाणी आदींनीही शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. मुख्याधिकार्यांनी या संदर्भात सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्याकडे आपली बाजू मांडली. पालिकेची ही मालमत्ता असल्याने स्क्रॅप मालाबाबत नेमका काय ठराव आहे वा नाही याबाबत लेखी सादर करण्याचे आदेश नीलोत्पल यांनी मुख्याधिकार्यांना दिले. पालिकेने रेकॉर्ड दिल्यानंतर पुढील कारवाईची दिशा ठरवली जाणार असल्याचे सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल म्हणाले.
विरोधकांचे आरोप निरर्थक -मुख्याधिकारी
मुळात विरोधकांनी थेट पालिकेत प्रवेश करणे चुकीचे असून त्यांनी आपल्याला कल्पना देणे गरजेचे होते. जीर्ण झालेल्या कौलांची वाहतूक केली जात होती व नियमबाह्य नाही. विरोधकांनी केलेले आरोप धादांत चुकीचे व खोटे असल्याचे मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर म्हणाले.