भुसावळ नगराध्यक्ष रमण भोळे यांना 22 लाखांचा दंड

0

प्रांतांचा दणका ; बिनशेतीची परवानगी न घेता शेतीचा औद्योगिक कामासाठी केला वापर

भुसावळ- शेतीचा औद्योगिक कामासाठी वापर करताना बिनशेतीची परवानगी न घेतल्याने भुसावळचे नगराध्यक्ष रमण भोळे यांना भुसावळचे प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी 21 लाख 84 हजार 380 रुपयांचा दंड सुनावल्याने भुसावळातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. किशोर उखा पाटील यांनी या संदर्भात तहसील प्रशासनाकडे तक्रार केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने प्रशासनाने खातरजमा केल्यानंतर दंडात्मक कारवाईचा निर्णय प्रांताधिकार्‍यांनी घेतला.

असे आहे नेमके प्रकरण
भुसावळचे नगराध्यक्ष रमण भोळे यांची मौजे सतारे शिवारात मारोती स्ट्रोन क्रेशर कंपनी आहे. स्ट्रोन क्रशर कंपनी औद्योगिक प्रयेाजनासाठी चालवण्यासाठी शेती ही बिनशेती असणे गरजेचे असून त्यासाठी रीतसर परवानगी आवश्यक आहे मात्र त्याबाबत परवानगी न घेता शेत जमिनीचा वापर सुरू असल्याने व शासनाचा महसूल बुडत असल्याने किशोर उखा पाटील यांनी महसूल प्रशासनाकडे तक्रार करून महाराजस्व अभियानांतर्गत दंड वसुल करण्याची मागणी केली होती. प्रशासनाने याबाबत चौकशीचे आदेश दिल्यानंतर तक्रारीत तथ्य आढळल्यानंतर प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी नगराध्यक्ष रमण भोळे यांना 21 लाख 84 हजार 380 रुपयांचा दंड सुनावला होता मात्र त्यानंतरही दंडाची रक्कम न भरण्यात आल्याने किशोर पाटील यांना पुन्हा प्रशासनाकडे तक्रार नोंदवली आहे.

आकसातून तक्रार -नगराध्यक्ष रमण भोळे
तक्रारदार किशोर उखा पाटील यांच्याविरुद्ध शेताच्या बांधावरील अतिक्रमण प्रकरणी न्यायालयात दिवाणी दावा प्रलंबित असून त्यांनी आपल्याविरूद्ध आकसातून तक्रार केली आहे. स्टोन क्रशर कंपनीबाबत अन्य सर्व परवानगी आमच्याकडे होत्या मात्र जमिनी एन.ए. परवानगी रिन्यूएल नसल्याने दंड आकारण्यात आला आहे. अद्याप दंड भरलेला नाही, असे नगराध्यक्ष रमण भोळे यांनी सांगितले.