भुसावळ नियंत्रण कक्षातील हवालदाराचा हृदयविकाराने मृत्यू

0

भुसावळ- भुसावळ नियंत्रण कक्षातील कार्यरत हवालदाराला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री पावणेआठ वाजेपूर्वी घडली. हवालदार विजय मोतीलाल अधिकार (55) असे मृत कर्मचार्‍याचे नाव आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या निवासस्थानी रविवारी रात्री ते कर्तव्यावर असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. बंगल्याबाहेरील कक्षात ते निपचीत पडले असल्याचे स्वयंपाकीच्या लक्षात आल्याने त्यांनी शहर पोलिसांना याबाबतची माहिती कळवली. शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक दीपक गंधाले, उपनिरीक्षक विशाल पाटील, हवालदार गजानन देशमुख, विनोद वीतकर आदींनी लागलीच घटनास्थळी धाव घेत अधिकार यांना डॉ.राजेश मानवतकर यांच्या दवाखान्यात हलवले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृत विजय अधिकार यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, मुलगी असा परीवार आहे. या घटनेने पोलीस दलावर शोककळा पसरली आहे.