भुसावळ पाणीपुरवठा योजना दुरुस्तीचा अहवाल पाठवा

आमदार संजय सावकारे यांच्या पत्रावर मुख्यमंत्र्यांनी दिले प्रधान सचिवांना आदेश

भुसावळ –  शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेच्या जलशुद्धीकरण केंद्रातील मशिनरी जुनाट आणि कालबाह्य झाल्याचे पत्रं आमदार संजय सावकारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले होते. त्या पत्राची दखल घेऊन मुख्यमंत्री शिंदे यांनी चौकशी करून वस्तुनिष्ठ माहिती सादर करण्याचे आदेश प्रधान सचिव यांना दिले आहेत.
आमदार सावकारे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, भुसावळ जलशुद्धीकरण केंद्रात दोन पंप असून ते जुनाट आणि कालबाह्य झालेले आहेत. त्यामुळे ते वारंवार बंद पडतात. शहराला गढूळ पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरात होत असलेल्या वैशिष्ट्ये पुर्ण योजनेत या कामांचा समावेश करावा आणि निधी मंजूर करून द्यावा. आज जळगाव शहराची लोकसंख्या अडीच लाखाच्या आसपास आहे. त्यामुळे पाणी पुरवठा नियमित आणि पुरेसा होणे गरजेचा आहे. जलशुद्धीकरण केंद्रातील पंप दुरुस्त आणि अद्ययावत करणे. शुद्ध पाणी साठवण क्षमता टाकी वाढविणे. या संपूर्ण कामासाठी 3 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तरी वैशिष्ट्ये पूर्ण योजनेतून निधी उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना दिलेले पत्रात केली आहे.