रेल्वे प्रशासन जागेच्या बदलात लोहमार्ग वसाहतीची जागा देणार ; पालिका कामकाजाची जिल्हाधिकार्यांनी घेतली माहिती
भुसावळ (प्रतिनिधी)- भुसावळ रेल्वे स्थानकाचा विकास करण्याच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाकडून साततत्याने प्रयत्न सुरू असतानाच रेल्वे स्थानकानजीकच असलेल्या पालिकेच्या जीर्ण इमारतीची जागा रेल्वेला दिल्यास त्या बदल्यात लोहमार्ग पोलीस वसाहतीची जागा रेल्वे प्रशासन पालिका प्रशासनाला देईल, असा प्रस्ताव रेल्वे प्रशासनाने दिल्यानंतर जिल्हाधिकार्यांनी जागा अदला-बदलीच्या प्रक्रियेस गुरुवारी ‘ग्रीन सिग्नल’ दिला. जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी अचानक भुसावळ पालिकेला भेट कामकाजाचा आढावा घेतला तर लोहमार्ग वसाहतीची पाहणी करून डीआरएम आर.के.यादव यांच्याशी चर्चादेखील केली. भुसावळ पालिकेला मिळालेल्या पुरस्काराबद्दल जिल्हाधिकार्यांनी नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह सर्व टीमचे कौतुक केले तसेच शहरातील घरकुलांचा प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना पदाधिकार्यांसह अधिकार्यांना केल्या विविध प्रस्ताव पाठवा, आपण तातडीने त्यास मंजुरी देऊ, असे आश्वासनही त्यांनी देऊन पालिका पदाधिकार्यांचा उत्साह वाढवला.
जिल्हाधिकार्यांनी केली लोहमार्ग वसाहतीची पाहणी
रेल्वे स्थानकासमोरील जुन्या पालिका इमारतीची जागा रेल्वेला दिल्यास त्या बदल्यात यावल रोडवरील लोहमार्ग वसाहतीची जागा पालिकेला देण्याबाबत प्रस्ताव देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर यावल रोडवरील सेंट अलॉयसीस शाळेच्या बाजूला असलेल्या जीआरपी पोलिस वसाहतीच्या जागेची पाहाणी जिल्हाधिकारी कीशोर राजे निंबाळकर यांनी केली. गुरुवारी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकार्यांनी भेट दिली. त्यांनी पालिका कार्यालयास भेट देत तेथून थेट लोहमार्ग वसाहतीची पाहाणी केली. यावेळी त्यांच्या समवेत नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे, पालिकेतील गटनेते मुन्ना तेली, युवराज लोणारी, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल मुंडके, रमेश नागराणी, रमेश मकासरे आदी उपस्थित होते. रेल्वेची रस्त्यावर जागा असल्याने पालिकेच्या नवीन इमारतीसाठी ही जागा चांगली असून नागरिकांना सुध्दा ही जागा सोईची राहू शकते. त्यामुळे पालिकेच्या इमारतीसाठी ही जागा योग्य असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. भाजपा सरचिटणीस प्रा.सुनील नेवे यांच्या घरी नगराध्यक्ष भोळे व सदस्यांशी चर्चा करण्यात आली.
डीआरएम यांच्याशी जिल्हाधिकार्यांनी केली चर्चा
जिल्हाधिकारी निंबाळकर, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके, नगराध्यक्ष भोळे, उपनगराध्यक्ष लक्ष्मी मकासरे, युवराज लोणारी यांनी डीआरएम कार्यालयात डीआरएम आर.के. यादव यांच्याशी चर्चा केली. यावेळी रेल्वेची जागा पाहून आलो असून जागेची अदलाबदल करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, असे जिल्हाधिकारी निंबाळकर म्हणाले. रेल्वे प्रशासन, पालिका व भूमी अभिलेख विभागातर्फे रेल्वे व पालिकेच्या जागेचे तत्काळ मोजमाप करून घ्यावे, त्यासाठी पालिकेने भूमी अभिलेख विभागाला पत्र देऊन मोजणीचे नियोजन करावे, अश्या सूचना दिल्यात.
जिल्हाधिकार्यांकडून शासकीय गोदामाची पाहणी
लोकसभेच्या सार्वजनिक निवडणूकांसाठी वापरण्यात येणारे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र ठेवण्यासाठी सर्व सोयींनीयुक्त अशा जागेची निवड करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिल्याने जिल्हाधिकार्यांनी गुुरुवारी रावेर लोकसभा मतदार संघासाठी वापरण्यात येणार्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र ठेवावयाच्या भुसावळ येथील शासकीय गोदामाची पाहणी केली. भुसावळचे प्रांताधिकारी डॉ. श्रीकुमार चिंचकर, तहसीलदार संजय तायडे, निवडणूक तहसीलदार सुरेश थोरात यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघाच्या लोकसभा निवडणूकीसाठी वापरण्यात येणारे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र बेंगलोर येथून प्राप्त होणार आहेत.
प्रस्ताव देणार -डीआरएम आर.के.यादव
रेल्वेने जागा अदला-बदलाबाबत प्रस्ताव पालिकेला दिला असून लवकरच हा प्रस्ताव दिल्ली बोर्डाकडे रवाना केली जाईल. निश्चितच जागा अदला-बदलाची तिढा सुटेल, असा विश्वास डीआरएम आर.के.यादव यांनी व्यक्त केला. रेल्वे स्थानकाचा परीसर अद्यावत करण्यासाठी पालिकेच्या जुन्या जागेची मागणी रेल्वे प्रशासनाने केली आहे.
सकारात्मक चर्चा -नगराध्यक्ष रमण भोळे
जिल्हाधिकार्यांनी पालिकेच्या कामकाजाची पाहणी करून अमृत योजनेचा आढावा घेतला. लवकरच मुख्याधिकारी लाभणार असून घरकुलांचा प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना जिल्हाधिकार्यांनी दिल्या. पालिकेची जागा अदला-बदल करण्याच्या बाबीला जिल्हाधिकार्यांनी संमती दिली शिवाय पालिकेला पुरस्कार मिळाल्याने त्यांनी गौरव करून कामाबाबतीत समाधानही व्यक्त केल्याचे नगराध्यक्ष रमण भोळे म्हणाले.