भुसावळ पालिका दवाखान्यात होणार शवविच्छेदन

0

10 वर्षानंतर का असेना सूचले शहाणपण ; मयताच्या आप्तेष्टांना मोठा दिलासा ; शवविच्छेदन कक्षातील सफाई कामगारांना लवकरच प्रशिक्षण नागरीकांचे हेलपाटे थांबणार ; पालिका दवाखान्यात स्वतंत्र एमबीबीएस डॉक्टरांची नियुक्ती ; पोलिसांचा द्राविडी प्राणायाम थांबला

भुसावळ- राज्यभरातील पालिका दवाखान्यांमधील वैद्यकीय अधिकार्‍यांची पदे गोठवल्याने भुसावळात शवविच्छेदनाला ब्रेक लागल्याने तब्बल दहा वर्षांपासून मयताच्या आप्तेष्टांना शवविच्छेदनासाठी नजीकच्या यावलसह वरणगावात जावे लागत असल्याने प्रचंड मनस्ताप सोसावा लागत होता शिवाय राष्ट्रीय महामार्गावरील जंक्शन शहरात रात्री-बेरात्री होणार्‍या अपघातातील जखमींवर उपचारासह गुन्हेगारांच्या वैद्यकीय चाचणीसाठी पोलिसांना मोठा द्राविडी प्राणायाम करावा लागत होता मात्र नुकत्याच शहरात झालेल्या बहिणाबाई महोत्सवात आलेल्या मुख्यमंत्र्यांना माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर सर्व प्रक्रियांच्या परवानगीनंतर निवड समिती, जळगावतर्फे पालिकेच्या रुग्णालयात एमबीबीएस अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 7 मार्चपासून त्यांनी प्रत्यक्षात पदभार स्वीकारला असून लवकरच पालिकेच्या शवविच्छेदन कक्षात शवविच्छेदन केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. पालिका दवाखान्यातील शवविच्छेदन कक्ष सुरू होण्यासह वैद्यकीय अधिकार्‍यांच्या नियुक्तीबाबत ‘दैनिक जनशक्ती’ने वेळोवेळी आवाज उठवून सत्ताधार्‍यांच्या डोळ्यात अंजनही घातले होते.

पदे गोठवल्याने आप्तेष्टांचे हाल
सुमारे दहा वर्षांपूर्वी पालिका दवाखान्यात शवविच्छेदन होत असलेतरी वैद्यकीय अधिकार्‍यांची पदे गोठवण्यात आल्यानंतर वैद्यकीय अधिकार्‍यांना इतरत्र हलवण्यात आल्याने भुसावळात शवविच्छेदन बंद झाल्याने अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या मयतांच्या शवविच्छेदनासाठी वरणगाव, यावलसह प्रसंगी जळगावातही शवविच्छेदनासाठी हेलपाटे मारावे लागत होते. या प्रकारात पैशांसह वेळेचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत होता. नाशिक विभागात एकमेव ‘अ’ वर्ग पालिका असलेल्या व दरवर्षी 200 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करणार्‍या पालिकेला मानधनावर साधा वैद्यकीय अधिकारीदेखील नेमता न आल्याने सत्ताधार्‍यांवर टिकेची झोडही उठत होती. मात्र आता वैद्यकीय अधिकार्‍यांची नियुक्ती झाल्याने आप्तेष्टांचे हाल थांबणार आहेत.

ग्रामीण रुग्णालयाच्या कामास गती देण्याची गरज
भुसावळातील ग्रामीण रुग्णालयाचे काम पूर्णत्वाकडे आले आहे मात्र राज्य शासनाकडून पदांना अद्याप मंजुरी न मिळाल्याने हे काम रेंगाळले आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ग्रामीण रुग्णालयाच्या पदे मंजुरीचा प्रश्‍न सुटणार नसलातरी त्यानंतर किमान हा प्रश्‍न मार्गी लागावा, अशी अपेक्षा व्यक्त हेात आहे.

आप्तेष्टांचा त्रास होणार कमी
शहरातील रेल्वे स्थानक परीसरात अनोळखी व्यक्ती व प्रवासा दरम्यान प्रवाशाचा अपघाती मृत्यूच्या घटना नित्याच्याच झाल्या आहेत. अशा घटनांची पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद केली जात असलीतरी मयताचे शवविच्छेदन करणे आवश्यक असल्याने पोलिसांना व नातेवाईकांना मृतदेहासह नाहकचा त्रास सहन करीत 25 किलोमीटरवरील जळगाव तसेच वरणगावात जावे लागत होते. यात संबंधिताचा वेळ तर खर्ची पडण्यासह मात्र शासकीय वाहनावरील इंधनही वाया जावून मोठ्या प्रमाणावर खर्चदेखील शासनाला करावे लागत होते शिवाय घात-अपघातातील मयतांच्या शवविच्छेदनासाठी देखील मनस्ताप सोसावा लागत होता मात्र लवकरच हा त्रास कमी होणार आहे.

द्राविडी प्राणायाम थांबला
जंक्शन शहरात गुन्हेगारीदेखील तितकीच बोकाळली आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयीताची शासकीय रुग्णालयातच आरोग्य तपासणी करणे क्रमबाह्य आहे. यासाठी पोलिसांना संशयीत आरोपीला घेवून नजीकच्या वरणगावसह यावलला जावे लागत होते त्यामुळे पोलिसांचा वेळ वाया जाण्यासह मोठ्या प्रमाणावर इंधनही खर्च होत होते शिवाय या द्राविडी प्राणायमामुळे अनेकदा छोट्या-मोठ्या गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्याची इच्छा असूनही बर्‍याचदा पोलिस यंत्रणा दुर्लक्ष करीत होती मात्र आता यंत्रणेला काम करणे सोपे झाले आहे.

लवकरच होणार शवविच्छेदन
पालिका दवाखान्यातील शवविच्छेदन कक्षात पूर्वी तीन स्वच्छता कर्मचार्‍यांची (स्वीपर) नियुक्ती होती मात्र अलिकडच्या काळात त्यांचे निधन झाल्याने वारसा हक्काने त्यांच्या कुटुंबियातील सदस्यांना नोकरी मिळाली त्यात दोन पुरूषांसह एका महिलेचा समावेश आहे. या कर्मचार्‍यांना लवकरच जळगाव सामान्य रुग्णालयात प्रशिक्षण देण्यात येणार असून त्याबाबत पत्रही मुख्याधिकार्‍यांनी दिले आहे. शवविच्छेदन कक्षाची काहीशी झालेली दुरवस्था थांबवली जाणार असून मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ.किर्ती फलटणकर, डॉ.संदीप इंगळे आदींच्या उपस्थितीत बैठक घेवून सूचनाही केल्याचे समजते.