भुसावळ पालिकेची सभा ठरली वादळी : सहा मिनिटात 21 विषयांना मंजुरी

1

स्वच्छता पुरस्कारावरून वादंग : सत्ताधारी विरोधकांमध्ये हमरी-तुमरी

भुसावळ- पालिकेची शनिवारी झालेली सर्वसाधारण सभा चांगलीच वादळी ठरली. स्वच्छता महाराष्ट्र अभियान अंतर्गत पालिकेला मिळालेला स्वच्छता पुरस्कार मॅनेज करून मिळाल्याचा आरोप विरोधी नगरसेवकांनी केल्यानंतर सत्ताधारी व विरोधकांमध्य चांगलीच हमरी-तुमरी झाली. या प्रकारानंतर सत्ताधार्‍यांनी सर्व विषयांना मंजुरी देत सभागृहाबाहेर पाय काढल्याने अवघ्या सहा मिनिटात सभा गुंडाळण्यात आली.

विरोधकांना पोटदुखीचा आजार -नगराध्यक्ष
विरोधकांना पोटदुखीचा आजार झाला असून शहराचा विकास त्यांच्याकडून पाहिला जात नसल्याने ते असले उद्योग करीत असल्याचे नगराध्यक्ष रमण भोळे म्हणाले. शहरात अमृत योजनेसह अद्यावत उद्याने, काँक्रिट रस्ते, उत्कृष्ट दर्जाचे एलईडी दिवे लावले जात असून शहर एकीकडे कात टाकत असताना विरोधक मात्र विकासाला आडकाठी आणत असून आम्ही त्यामुळे विचलीत होणार नाही, असे भोळे म्हणाले.

शहरात अस्वच्छता, अशुद्ध पाण्याने नागरीक त्रस्त -विरोधी नगरसेवकांचा आरोप
शहरात सर्वत्र अस्वच्छता असून सर्वत्र केरकचरा साचला आहे. खडका रोड भागात तर सर्वाधिक अस्वच्छता असून नागरीकांना अशुद्ध पाणीपुरवठा केला जात असल्याचे जनआधारचे गटनेता उल्हास पगारे व नगरसेवक दुर्गेश ठाकूर म्हणाले. पालिकेत सत्ताधार्‍यांनी मनमानी चालवली असून मोठ्या प्रमाणावर बिले काढली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.