भुसावळ : पालिकेच्या सर्वसाधारण सभेला मुहूर्त गवसला असून मंगळवार, 12 रोजी सकाळी 11 वाजता पालिकेच्या सभागृहात सर्वसाधारण सभा होणार आहे. सभेच्या पटलावर तब्बल 78 विषय आहेत. बहुचर्चित मामाजी टॉकीज रोडसह वरणगाव रस्त्याच्या डांबरीकरणाचा प्रश्न सभेत विषयाला मंजुरी मिळाल्यानंतर मार्गी लागणार आहे. असे असलेतरी तीन महिन्यात शहर विकासाची ग्वाही दिल्यानंतरही प्रत्यक्षात कुठलीही विकासकामे होत नसल्याने जनआधार विकास पार्टीचे नगरसेवक पालिकेचा आखाडा तापवणार असल्याचे राजकीय सूत्रांनी सांगितले.
बहुमताच्या जोरावर सभेत सर्व विषयांना मंजुरी मिळते की शहर विकासाच्या विषयांवर सखोल चर्चा होते? याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. पालिका सभागृहात होणार्या सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष रमण भोळे असतील. व्यासपीठावर उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर, गटनेता मुन्ना तेली यांची उपस्थिती राहणार आहे. गेल्या वर्षभरापासून शहरात विकासकामे झाली नसल्याची ओरड विरोधक करीत असून सभेत नेमके काय-काय घडते? याबाबत उत्सुकता पणाला लागली आहे.