राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकार्यांनी दिला उपोषणाला पाठिंबा
भुसावळ- पालिकेतील रोजंदारी कर्मचारी तसेच 23 वर्ष चालक राहिलेल्या अशोक मेहरूमल मोटवानी यांनी न्यायासाठी गुरुवार 7 मार्चपासून भुसावळ पालिकेबाहेर आमरण उपोषण छेडले आहे. नगरपालिका प्रशासनाने रीट याचिकेबाबत वरीष्ठांना योग्य तो अभिप्राय, शेरा न दिल्याने न्याय मिळण्यास विलंब झाल्याने सर्व बाबींची चौकशी करून न्याय मिळावा, अशी मागणी मोटवानी यांनी केली आहे.
नगरपालिकेच्या उदासीन कारभाराचा बसला फटका
भुसावळ नगरपालिकेचे कर्मचारी चालक अशोककुमार मेहरूमाला मोटवानी हे भुसावळ महानगरपालिकेत चालक म्हणून 1985 मध्ये लागले होते तर 1987 मध्ये ते कायमस्वरूपी कर्मचारी झाले. 2010 पर्यंत अशी एकुण 23 वर्षे चालक म्हणून काम केले मात्र अचानकपणे नगरपालिका प्रशासनाने कोणतेही कारण नसतांना अचानकपणे कामावरून कमी केल्यानंतर अशोककुमार मोटवानी यांनी भुसावळ नगरपालिकेविरोधात न्यायालयात तक्रार दाखल केली. औरंगाबाद खंडपीठाचे न्या.ए.व्ही. गंगाधरवाला आणि ए.ए.धवाळे यांनी तक्रारदार अशोककुमार मोटवाणी यांची बाजू समजून घेतल्यानंतर अशोक मोटवाणी यांच्या बाजूने निकाल दिला. त्यांना त्वरीत कामावर घ्यावे, असे निर्देश 11 एप्रिल 2018 रोजी भुसावळ नगरपालिका प्रशासनाला दिलेत. दरम्यान, न्यायालयाच्या निकालानंतर विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयातूनही 21 डिसेंबर 2018 रोजी या प्रकरणी पत्रव्यवहार झाला असता नगरपालिका प्रशासनाने मोघम स्वरूपाचा अहवाल तयार केला. औरंगाबाद खंडपीठाचा निकाल आणि नाशिकच्या विभागीय आयुक्तांचे पत्रव्यवहार होवूनही भुसावळ नगरपालिका प्रशासनाची कोणतीही दखल घेतली नसल्याने गुरुवारपासून उपोषण छेडल्याचे मोटवानी यांनी कळवले आहे.
राष्ट्रवादीचा जाहीर पाठिंबा
मोटवाणी यांच्या उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने पाठिंबा दर्शवला आहे. शहराध्यक्ष नितीन धांडे, मयुरी पाटील, रणजित चावरीया, मुन्ना सोनवणे, विशाल भंगाळे, गणेश टेकावडे आदींची प्रसंगी उपस्थिती होती.
उपोषणार्थींची मागणी चुकीची -मुख्याधिकारी
उपोषणार्थींची नेमणूक ही अनियमित असल्याची बाब उच्च न्यायालयाने मान्य केली आहे शिवाय त्याबाबत प्रादेशिक संचालकांकडून आदेश झाले आहे. पालिका प्रशासन नियुक्त प्राधिकारी नाहीत त्यामुळे उपोषणार्थींची मागणी चुकीची असल्याचे मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांनी सांगितले.