भुसावळ पालिकेच्या दिव्याखाली अंधार ; नगरसेवकांमध्ये खाजगीत तीव्र नाराजी

0

कमी उजेडामुळे नागरीकांच्या तक्रारी ; भुसावळ शहरात ईईएसएल कंपनीकडून एलईडी दिवे बसवण्यास सुरूवात

भुसावळ- तब्बल चार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर एनर्जी इफिशियन्सी सर्व्हिस लिमिटेड (ईईएसएल) शहरातील वीज खांबावर एलईडी दिवे बसविण्यास सुरूवात झाली असून या दिव्यांचा प्रकाश अत्यंत कमी असल्याने नगरसेवकांमधूनच नाराजी व्यक्त केली जात आहे. जाहीरपणे कुणी याबाबत बोलत नसलेतरी नगरसेवक खाजगीत मात्र नाराजी व्यक्त करीत आहेत. पालिकेने शहरात ईईएसएल कंपनीसोबत सात वर्ष पथदिव्यांचा करार केला असून आता पालिकेला आगामी सात वर्ष पथदिव्यांसाठी अधिक मेंटनन्स खर्च करण्याची आवश्यकता नसेल तर पालिकेच्या वीज बिलातही यामुळे बचत होणार आहे.

अगदीच स्पॉट लाईटप्रमाणे उजेड
माजी महसूलमंत्री आमदार एकनाथराव खडसे, आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे यांनी नुकतीच मुंबईत नगरविकास विभागाच्या सचिवांसोबत आढावा बैठक झाल्यानंतर त्यात हा मुद्दा मांडण्यात आला. यामुळे शहरात गेल्या काही दिवसांपासून ईईएसएल कंपनीने पथदिवे बसविण्याच्या कामाला नुकतीच सुरूवात केली आहे. प्रभाग क्रमांक एकमध्ये सध्या हे दिवे बसवले जात असून या दिव्यांचा प्रकाश अत्यंत कमी पडत असल्याने नागरीकांमधूनही नाराजी व्यक्त होत आहे. प्रभात कॉलनी, पवन नगर, गोपाळनगर पोलिस चौकी परीसर आदी ठिकाणी दिवे बसविण्यात आल्याचे सांगण्यात आले. इंटरनॅशनल स्टॅण्डर्डनुसार रस्त्याची रुंदी पाहून प्रकाश देणारे दिवे बसविण्यात येत असल्याचे सांगितले जात असलेतरी पूर्वीच्या ट्यूबलाइट व अन्य दिव्यांपेक्षा या दिव्यांचा प्रकाश कमी पडत असल्याने व स्पॉट लाईटप्रमाणे प्रकाश असल्याने काही नगरसेवकदेखील खाजगी नाराजी व्यक्त करीत आहेत मात्र भाजपच्या नेत्यांनी ही योजना मंजूर केल्याने कोणीही नेत्यांजी नाराजी ओढवून घ्यायला तयार नाही हेदेखील तितकेच खरे !

काही प्रश्‍न असल्यास तोडगा काढणार -नगराध्यक्ष
ईईएसएल कंपनीमार्फत दिवे बसवण्याचे काम सुरू असून काही ठिकाणी तक्रारी असल्यास निश्‍चित त्याबाबत संबंधीत कंपनीशी चर्चा करून तोडगा काढण्यात येईल, असे नगराध्यक्ष रमण भोळे यांनी सांगितले.

कंपनी बदलल्याने नागरीक समाधानी -अमोल इंगळे
सुरुवातीच्या कंपनीकडून लावण्यात आलेले दिवे अत्यंत कमी प्रकाश देत असल्याने आता कंपनी बदलण्यात आल्याने नागरीकांमधून समाधान व्यक्त होत आहे. ओम पार्क, साईचंद्र नगर भागातून नागरीकांच्या तक्रारी होत्या मात्र लवकरच या भागातील दिवे बदलले जाणार असून कॉर्नरच्या ठिकाणी उजेड कमी असल्याने ते दोन दिवे लावले जात असल्याचे नगरसेवक अमोल इंगळे म्हणाले.