भुसावळ पालिकेच्या सभेत 15 मिनिटात शहर विकासाच्या 21 विषयांना मंजुरी

0

पालिकेच्या सभेवर विरोधकांनी टाकला बहिष्कार : शहरातील खड्डेमय रस्त्यांमध्ये केले वृक्षारोपण

भुसावळ- तब्बल अडीच महिन्यानंतर होणारी पालिकेची सभा वादळी होईल, असे संकेत असलेतरी विरोधकांनी या सभेवर मात्र बहिष्कार टाकला तर दुसरीकडे नेहमीच पोलीस बंदोबस्तात होणारी सभा सत्ताधार्‍यांनी बंदोबस्ताविना पूर्णवेळ चालवत 15 मिनिटात 21 विकासात्मक विषयांना मंजुरी दिली. शहरातील खड्डेमय रस्त्यांची दुरुस्ती तसेच अन्य महत्त्वाच्या विषयांना सभागृहात सत्ताधार्‍यांनी एकमुखी मंजुरी देण्यात आली. शहराला लागून असलेल्या विस्तारीत भागात सोयी-सुविधा मिळत नसल्याने नगरसेवकांवरील वाढता रोष पाहता विस्तारीत भाग शहरात समाविष्ट करावा, अशी महत्त्वपूर्ण मागणी नगरसेविका सोनल महाजन यांनी मांडली. दरम्यान, जनआधार विकास पार्टीच्या नगरसेवकांनी मुख्याधिकार्‍यांना सभेवर बहिष्कार टाकत असल्याचे पत्र देत शहरील खड्डेमय रस्त्यांमध्ये वृक्षारोपण करून आपला रोष नोंदवला.

विविध विषयांना मिळाली सभागृहात मंजुरी
गोपाळ नगरातील नूतन पालिकेच्या सभागृहात सोमवारी 11 वाजता सभा झाली. पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष रमण भोळे सभेच्या अध्यक्षतेस्थानी होते. व्यासपीठावर भाजपा गटनेते मुन्ना तेली, उपनगराध्यक्षा लक्ष्मी रमेश मकासरे व मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर उपस्थित होते. सभेला सुरुवात होण्यापूर्वी जनआधारचे उपगटनेते जाकिर सरदार, नगरसेवक दुर्गेश ठाकूर, सलीम पिंजारी आदी विरोधी नगरसेवकांनी माईकचा ताबा घेत शहरातील रस्ते व पाण्याचा प्रश्न उपस्थित केला. यानंतर तत्काळ मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांना निवेदन देवून या सभेवर बहिष्कार टाकत असल्याचे सांगून सभागृह सोडले. विरोधकांच्या खुर्चा रिकाम्या असतानाच पीठासीन अधिकारी रमण भोळे यांनी 11 वाजता सभेच्या कामाला सुरुवात केली. 11 वाजून 15 मिनिटांपर्यंत सर्व 21 विषयांचे वाचन होऊन प्रत्येक विषयांना सत्ताधार्‍यांनी आवाजी मंजुरी दिली. 11 वाजून 15 मिनिटांनी पिठासीन अधिकार्‍यांनी सभा संपल्याचे जाहिर केले. या सभेत शहरातील पाणीपुरवठा यंत्रणेवरील दोन्ही जलशुध्दीकरण केंद्रातील क्लोरिफाक्युरेटरचा गाळ काढून गाळाची विल्हेवाट लावणे, रस्त्यांवर मुरुम तसेच पावसाळी डांबर टाकून दुरुस्ती करणे, नगरपालिकेच्या पॅनलवर असलेल्या असलेल्या अ‍ॅडव्होकेट यांना तीन वर्ष मुदतवाढ व वकिल फी अदा करणे, पाणीपुरवठा योजनेवरील हातपंप व इतर साहित्य, व्हॉल्व्ह खरेदी करणे, अ‍ॅलम पुरवठ्याला कार्योत्तर मंजूरी, म्युनिसीपल हायस्कूलचे कौले काढून पत्रे बसविणे आदी विषयांना मंजूरी देण्यात आली.

सोनल महाजनांनी मांडला महत्वपूर्ण मुद्दा
शहरातील तब्बल सात प्रभागांचा बहुतांश भाग विस्तारीत भागात समाविष्ठ होतो. पालिका हद्दीत हा भाग नसल्याने तेथे सुविधा देता येत नाहीत यामुळे या भागातील नागरीकांचा संबंधीत नगरसेवकांवर रोष वाढतो. यामुळे विस्तारीत भाग हद्दवाढ करून पालिकेत समाविष्ठ करावा, अशी महत्वपूर्ण मागणी सत्ताधारी भाजपच्या नगरसेविका सोनल रमाकांत महाजन यांनी व्यक्त केली. याबाबत त्यांनी नगराध्यक्ष व मुख्याधिकार्‍यांना निवेदन सादर केले. यावर नगराध्यक्षांनी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

200 खुर्च्या खरेदीसाठी प्रयत्न
पालिकेच्या सर्वसाधारण सभेत दरवेळी खुर्चा भाडेपट्टीवर घ्याव्या लागतात. यामुळे दरवेळी नाहक खर्च होतो. यापेक्षा पालिकेने 200 खुर्च्या विकत घ्याव्यात, असा मुद्दा उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे यांनी मांडला. यावर नगराध्यक्ष रमण भोळे यांनी होकार दर्शवित, यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामुळे नवीन खुर्च्या लवकरच येतील, असे सांगितले.

नियमित होणार सभा -नगराध्यक्ष
विरोधकांनी केलेले वृक्षारोपणाचा प्रकार म्हणजे निव्वळ चमकोगिरीचा प्रयत्न आहे. त्यांच्या नेत्यांच्या इशार्‍यावरून आजचा प्रकार घडला. मुळात सभेच्या अजेंड्यावर शहरातील खड्डे बुजवण्याचा विषय प्राधान्याने घेण्यात आला मात्र सभेला हजर न राहता विरोधकांनी चमकोगिरी आंदोलन केले. सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावरील 21 विषयांना सभागृहात मंजुरी मिळाली. आता दरमहा सभा होईल. वेळप्रसंगी 15 दिवसांत सभा घेवू. यापुढे अजेंड्यावर केवळ 25 ते 50 विषय घेतले जातील. कमी वेळेत सभा घेतल्याने कमी विषयांचा तत्परतेने पाठपुरावा होईल, सभेतून विषयांना चालना मिळेल, असेही नगराध्यक्ष रमण भोळे म्हणाले.

उपगटनेत्यांनी केली सभा रद्दची मागणी
जनआधारचे उपगटनेता शेख जाकीर सरदार यांनी मुख्याधिकार्‍यांना लेखी निवेदन दिले. 3 मे 2018 रोजी झालेली व स्थायी समितीच्या सभा या बेकायदेशीर असल्याने त्या रद्द करण्याबाबत मागणी करण्यात आली. जिल्हाधिकार्‍यांकडे 308 प्रमाणे सभा रद्दची मागणी करण्यात आली असून सभा कायम करता येणार नाही, याबाबत त्यांनी आक्षेप नोंदवला. सोमवारची सर्वसाधारण सभादेखील तहकूब करावी, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, प्रभाग क्रमांक 18 चे नगरसेवक रवींद्र सपकाळे यांनीदेखील पालिका प्रशासनाला निवेदन दिले आहे. आपल्या प्रभागात जाणून-बुजून कुठलेही विकासाचे विषय घेण्यात आलेले नाहीत, असा आरोप करीत प्रभागात गढूळ पाणीपुरवठा होत असतानाही दखल घेतली जात नसल्याची त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

विरोधी नगरसेवकांनी केले खड्ड्यात वृक्षारोपण
शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था व शहरवासीयांना होत असलेल्या गढुळ पाणीपुरवठ्यामुळे विरोधकांनी सभेवर बहिष्कार टाकत मामाजी टॉकीज रोड व बसस्थानक परीसरात खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण केले. जामनेर रोडवरील एचडीएफसी बँकेसमोर व बसस्थानकाजवळ वृक्षारोपण करण्यात आले. उपगटनेते शेख जाकीर हाजी, नगरसेवक सलिम पिंजारी, रवी सपकाळे, दुर्गेश ठाकूर, आशिक खान शेरखान, सचिन पाटील, ईम्तियाज शेख, प्रदीप देशमुख, ललित मराठे, ईकबाल बागवान आदींची उपस्थिती होती.