भुसावळ पालिकेच्या सभेत 26 मिनिटात 34 विषयांना मंजुरी

0

शहरात आगामी काळात पाणीप्रश्‍न बिकट ; नगराध्यक्षांची व्यक्त केली चिंता ; पाण्यासह स्वच्छता होत नसल्यानेन नगरसेवकांची नाराजी

भुसावळ- नगरपालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवार, 30 रोजी सकाळी 11 वाजता गोपाळ नगरातील पालिकेच्या सभागृहात प्रथमच गोंधळाविना पार पडली. सभेत 26 मिनिटात सर्व 34 विषयांना सत्ताधार्‍यांनी एकमताने मंजुरी दिली तर जनआधार विकास पार्टीच्या गटनेत्यांसह चौघा नगरसेवकांवर झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ जनआधारच्या नगरसेवकांनी बैठकीवर बहिष्कार टाकला व त्याबाबत मुख्याधिकार्‍यांना तसे पत्रही दिले. पीठासन अधिकारी नगराध्यक्ष रमण भोळे होते. व्यासपीठावर उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे व मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर उपस्थित होते. सभेत नगरसेवकांनी आगामी काळातील पाणीप्रश्‍न तसेच शहरात स्वच्छता होत नसल्याने सत्ताधार्‍यांनी नाराजी व्यक्त केली.

34 विषयांना सभागृहात बहुमताने मंजुरी
सभेच्या अजेंड्यावर एकूण 34 विषय होते तर या सर्व विषयांना सत्ताधार्‍यांनी बहुमताने मंजुरी दिली. मंजूर विषयांवर पालिकेच्या दवाखान्यात औषधांची खरेदी करणे, शहरातील नगरपालिका दवाखाने, शाळा-मुलींच्या कॉलेजमध्ये तसेच अन्य आवश्यक ठिकाणी सॅनॅटरी पॅड वितरण मशीनची खरेदी करणे, प्रभाग 19 मध्ये रीटेनिंग वॉल बांधणे, शहरातील स्मशानभूमी, कब्रस्थान, ख्रिश्‍च चर्च आदी ठिकाणी पथदिव्यांची व्यवस्था करणे, टँकर व ट्रॅक्टरची खरेदी करणे, तापी नदीवर बंधार्‍यासाठी निविदा प्रक्रिया मंजूर करणे या शिवाय शहरातील विविध भागात पेव्हर ब्लॉक, गटारींच्या कामांना मंजुरी देण्यात आली.

टंचाईच्या चटक्यांपूर्वीच करा उपायययोजना -पिंटू कोठारी
नगरसेवक पिंटू कोठारी यांनी शहरातील पालिकेच्या मालकिचा विहिरींचा उपसा करून त्या वापरात आणण्याची सूचना केली तसेच पालिकेच्या तापीतील बंधार्‍याच्या उंचीचे काम उन्हाळ्याला सुरुवात होण्यापूर्वीच करण्याबाबत विषय मांडला तसेच शहरातील स्मशानभूमी व कब्रस्थानमध्ये खाजगी इसमाची स्वच्छतेसाठी नियुक्ती करण्याची सूचना मांडली. त्यास स्वीकृत नगरसेवक प्रा.सुनील नेवे यांनी अनुमोदन दिले. नगराध्यक्षांनी याबाबत सकारात्मक विचार करण्याची ग्वाही देत आगामी बैठकीत स्मशानभूमीसाठी खाजगी व्यक्तीची नेमणूक करण्यासंदर्भात विषय घेतला जाईल, अशी हमी दिली.

सिंधी कॉलनीत पाणीप्रश्‍न बिकट- पुष्पा बत्रा
नगरसेविका पुष्पा बत्रा यांनी शहरातील सिंधी कॉलनीत पाणीप्रश्‍न बिकट झाल्याचे सांगत याबाबत दखल घ्यावी, अशी मागणी केली. नगराध्यक्षांनी पाणीप्रश्‍नाबाबत संबंधित विभागाला सूचना करण्यात येईल, असे आश्‍वासन दिले.

स्वच्छता नावालाच – नगरसेविकांनी मांडल्या व्यथा
पालिकेची बैठक संपल्यानंतर सत्ताधारी उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे, नगरसेविका सोनल महाजन यांच्यासह अन्य नगरसेविकांनी मुख्याधिकार्‍यांची भेट घेत स्वच्छता होत नसल्याची तक्रार केली. कचरा संकलन ठेकेदार संतोष ठाकूर यांच्या कामकाजाबाबत नगरसेविकांनी तीव्र शब्दात तक्रार केली. प्रभागात स्वच्छता होत नसल्याने नागरीक आमच्या नावाने ओरडतात त्यामुळे संबंधित ठेकेदाराची कानउघाडणी करावी, अशी मागणी या नगरसेविकांनी केली. मुख्याधिकार्‍यांनी या संदर्भात दखल घेण्याचे आश्‍वासन दिले.

विरोधी नगरसेवकांचा सभेवर बहिष्कार
तत्कालीन मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी जनआधारच्या गटनेत्यांसह चौघा नगरसेवकांना अपात्र केल्यानंतर या कारवाईच्या निषेधार्थ जनआधार विकास पार्टीच्या नगरसेवकांनी मंगळवारच्या पालिकेच्या सभेवर बहिष्कार टाकला. या संदर्भात उपगटनेता शेख जाकीर सरदार यांनी दिलेल्या निवेदनानुसार प्रथमच निवडून आलेल्या नगरसेवक-नगरसेविका यांना कोणत्याही अनुभव नसताा तत्कालीन मुख्याधिकारी बाविस्कर यांनी पदाचा दुरूपयोग करून अपात्रतेबाबत प्रस्ताव पाठवला. सभागृहात ते चित्रीकरण झाले ते प्रशासनाला न दाखवता चुकीचे चित्रीकरण दाखवल्यामुळे राज्यमंत्र्यांनी एकतर्फी निर्णय दिला. या घटनेचा जनआधार विकास पार्टी निषेध करीत असून त्यामुळेच सभेवर बहिष्कार असल्याचे निवेदनात नमूद आहे.