भुसावळ पालिकेने ‘ना नफा ना तोटा तत्वावर’ रेमसीव्हरची खरेदी करून विक्री करावी

सामाजिक कार्यकर्त्यांचे लोकनियुक्त नगराध्यक्षांना निवेदन

भुसावळ : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची सातत्याने होत असलेली वाढ व रेमेडेसीव्हरची इंजेक्शनची वाढती मागणी पाहता भुसावळ पालिकेने ‘ना नफा ना तोटा तत्वावर’ रेमसीव्हरची इंजेक्शन0ची खरेदी करून ती विक्री करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी नगराध्यक्ष रमण भोळे यांच्याकडे सोमवारी निवेदन देवून केली. कोरोना उपचारासाठी लागणारे इंजेक्शन रेमडिसिव्हरचा कृत्रिम तुटवडा भासत असून मोठ्या प्रमाणात त्यात आर्थिक गैरव्यवहार होत असून सर्व सामान्य रुग्ण त्यामुळे हतबल होत आहे. सेवा हेच कर्तव्य हे ब्रीद वाक्य असलेल्या भुसावळ नगरपालिकेने इंजेक्शन रेमडिसिव्हर हे थेट कंपनी मार्फत खरेदी करून ना नफा ना तोटा तत्वावर भुसावळ शहरातील सर्वसामान्य रूग्णांना आपल्या आरोग्य केंद्राद्वारे उपलब्ध करून दिले तर नक्कीच रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना दिलासा देणारी बाब राहील, असा आशावाद या निवेदनातून व्यक्त करण्यात आला आहे. व्यापक जनहित पाहता या विषयावर लवकरात लवकर योग्य ती कारवाई अपेक्षित असल्याचे निवेदनात नमूद आहे. नगराध्यक्ष रमण भोळे व मुख्याधिकारी संदीप छिद्रवार यांना निवेदन देतांना डॉ.नितु पाटील, भाजपा शहराध्यक्ष परीक्षित बर्‍हाटे, संदीप सुरवाडे आदींची उपस्थिती होती.