भुसावळ पालिकेने 125 झेंड्यांसह फलक हटवले

आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी : आज यावल रोडवर मोहिम

भुसावळ : भुसावळ पालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर आदर्श आचारसंहिता शुक्रवारपासून लागू होताच पालिका प्रशासनाने शनिवारी शहरातील इलेक्ट्रीक पोलसह भिंती, झाडे यावर लावलेले राजकीय पक्षांचे बॅनर्स, झेंडे, पोस्टर काढण्याचे काम केले. पहिल्याच दिवशी शनिवारी जळगाव, जामनेर रोडसह वरणगाव रोडवरील राजकीय पक्षांचे सुमारे 125 झेंड्यांसह फलक हटवण्यात आले.

यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई भुसावळ पालिका मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, प्रशासकीय अधिकारी चेतन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वसंत राठेाड, प्रदीप पवार, अनिल भाकरे, गोपाळ पाली, अशेाक फालक, धर्मेद्र खरारे, अजय पिंजारी आणि फायर विभागाचे आणि सफाई कर्मचार्‍यांनी फलकांसह झेंडे जप्त केले. शनिवारी पालिकेतर्फे सकाळी आठपासून सायंकाळी पाचपर्यत कर्मचार्‍यांनी मोहिम राबवित राजकीय पक्षाचे साहित्य काढले तर रविवारी सुध्दा यावल रोड आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील राजकीय फलक काढले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.