भुसावळ पालिकेवर महिलांचा टमरेल मोर्चा

0

प्रभाग क्रमांक 22 मध्ये स्वच्छता होत नसल्याने तीव्र संताप

भुसावळ- शहरातील प्रभाग क्रमांक 22 मधील कृष्णानगर भागातील महिलांच्या सार्वजनिक शौचालयाची तीन महिन्यांपासून स्वच्छता न झाल्याने संतप्त महिलांनी पालिकेवर सोमवारी टमरेल मोर्चा काढल्याने खळबळ उडाली. प्रसंगी उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे यांना मोर्चेकर्‍यांनी घेराव घालत पालिकेच्या कारभाराचे वाभाडे काढत नगरसेवकांविषयी संताप व्यक्त केला. सेफ्टी टँक तीन महिन्यांपासून तुंबला असून तक्रारींना केराची टोपली दाखवली जात असल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. तातडीने दखल घेण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर मोर्चेकरी महिला शांत होवून माघारी परतल्या.

स्वच्छता होत नसल्याने निघाला मोर्चा
शहरातील प्रभाग 22 मधील कृष्णानगर भागातील महिला सिंधी कॉलनीतील राज टेंट हाऊसच्या मागील भागात असलेल्या सार्वजनिक शौचालयाचा वापर करतात मात्र या शौचालयाच्या सेफ्टी टँक गेल्या तीन महिन्यांपासून चोकअप झाला असून सार्वजनिक शौचालय आता वापरात येत नाही. उघड्यावर शौचालयासाठी देखील जागा उपलब्ध नसल्याने महिलांची कुचंबणा होत आहे. या प्रकरणी महिलांनी तीन महिन्यांपूर्वी या भागाचे नगरसेवक किरण कोलते यांच्याकडे गर्‍हाणे मांडले होते. कोलते यांनी पालिकेत तब्बल आठ ते दहा वेळा हे शौचालय व्हॅक्युमच्या सहाय्याने स्वच्छ करून वापर करण्याची मागणी केली मात्र सत्तेत असलेल्या कोलतेंच्या मागणीकडे दूर्लक्ष झाले. ही समस्या पून्हा वाढतच गेल्याने संतप्त महिलांनी सोमवारी कृष्णानगर भागातून हातात टमरेल घेवून पालिकेवर मोर्चा काढला. पालिका आवारात येताच ठिय्या आंदोलन करण्यात आले. उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे यांना साकडे व घेराव घालून महिलांनी समस्या मांडल्या. प्रभाग 22 मधील सार्वजनिक शौचालय व अन्य समस्या तत्काळ मार्गी लावल्या जातील, असे आश्वासन मकासरे यांनी दिल्यानंतर मोर्चेकरी महिला घरी परतल्या.