भुसावळ बसस्थानकात कॅन्टीन चालकाकडून जागेचा अनधिकृत वापर

0

जळगावच्या अधिकार्‍यांकडून मोजणी ; राजू सूर्यवंशी यांच्या तक्रारीनंतर कारवाई

भुसावळ : बसस्थानकातील दत्तात्रय रेस्टारंट (कॅन्टीन) च्या चालकाने व्यवसायासाठी मिळालेल्या जागेपेक्षा अधिक जागा बळकावून अतिक्रमण केल्याची तक्रार आरपीआय गवई गटाचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांनी जळगाव विभाग नियंत्रकांकडे केल्यानंतर अधिकार्‍यांनी सोमवारी दुपारी जागेची मोजणी केली. तब्बल चार हजार स्वेअर फूट जागेचा अनधिकृत वापर करणार्‍या कॅन्टीन चालकावर व या प्रकाराला छुपा आशीर्वाद असणार्‍या एसटीच्या दोषी अधिकार्‍यांवर कारवाईची मागणी सूर्यवंशी यांनी केली आहे. कारवाई न झाल्यास जिल्हाभरात एसटी रोको आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

कॅन्टीन चालकाची मनमानी
सूर्यवंशी यांच्या तक्रारीनुसार राजेश सैनी यांचे बसस्थानकात दत्तात्रय रेस्टारंट (कॅन्टीन) आहे. व्यवसायासाठी त्यांना दोन हजार 900 स्वेअर फूट जागा देण्यात आली असलीतरी प्रत्यक्षात त्यांनी तीन हजार 600 खाली व तीन हजार 600 अशी जागा बळकावून अतिक्रमण केले आहे. कॅन्टीनच्या दर्शनी भागात केवळ मशीनने चहा विक्रीची परवानगी असताना हाताने तयार केलेली चहा विक्री केली जात आहे शिवाय सैनी यांनी हॉटेलचे मागील गेट बंद केल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. हॉटेल पदार्थदेखील अव्वाच्या सव्वा दराने विक्री केले जात असल्याचा आरोप सूर्यवंशी यांनी केला. संबंधिताचे टेंडर रद्द करावे तसेच या प्रकाराला दुर्लक्ष करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या संदर्भात सैनी यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

या अधिकार्‍यांनी केली मोजणी
भुसावळ आगारव्यवस्थापक हरीष भोई, सहाय्यक वाहतूक निरीक्षक सुनील पाटील, स्थानक प्रमुख प्रकाश भोई, कार्यशाळा अधीक्षक राकेश शिवदे, विभागीय वाहतूक अधिकारी प्रल्हाद घुले, वरीष्ठ लिपिक एम.एस.सहारे आदी अधिकार्‍यांनी कॅन्टीनच्या जागेची मोजणी केली.

वरीष्ठांच्या सूचनेनंतर कारवाई
जागेची मोजणी आम्ही केली असून त्याबाबतचा अहवाल वरीष्ठ स्तरावर पाठवण्यात येईल या संदर्भातील कागदपत्रे आम्ही मागवली असल्याचे आगार व्यवस्थापक हरीष भोई यांनी सांगितले. कारवाईचा निर्णय वरीष्ठ घेतील, असेही त्यांनी सांगितले.