भुसावळ-बोईसर बसला अपघात : 15 प्रवासी जखमी

चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस 20 फूट खोल दरीत उलटली

भुसावळ : भुसावळहून बोईसरला जाणार्‍या राज्य परीवहन महामंडळाच्या रातराणी स्लीपर बसला पालघरनजीक वाघोबा खिंडीत उलटून अपघात झाल्याने चालकासह सुमारे 15 प्रवासी किरकोळ जखमी झाले. भरधाव वेगात बस असल्यानेच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि भल्या पहाटे शुक्रवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास पालघरनजीक असलेल्या वाघोबा खिंडीतील खोल दरीत बस कोसळली, असा दावा या अपघातात जखमी प्रवाशांनी केला आहे. दरम्यान, जखमींमध्ये स्थानिक भुसावळसह जळगाव व बोईसर, पालघर येथील प्रवासी असल्याचे एस.टी.च्या सूत्रांनी सांगितले.

सुमारे 15 प्रवासी जखमी
राज्य परीवहन मंडळाची भुसावळ-बोईसर बसला शुक्रवारी सकाळी खोल दरीत उलटून अपघात झाला. या अपघातामध्ये सुमारे 15 प्रवासी जखमी झाले आहेत. सर्व जखमींना पालघरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांच्या प्राथमिक उपचार करण्यात आले. पालघर आगाराचे आगारप्रमुख नितीन चव्हाण यांच्यासह अधिकार्‍यांनी धाव घेत जखमींची विचारपूस केली. जवळपास सर्वच जखमी बोईसरसह पालघर भागातील असल्याचे त्यांनी सांगत जखमींना पाचशे ते हजार रुपयांची मदत देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जखमींची नावे कळू शकली नाहीत.