राजकीय गोटात खळबळ ; मुख्याधिकार्यांची गुरुवारी सेवानिवृत्ती ; जनआधारचे नगरसेवकही सहभागी
भुसावळ- शेतजमीन एन.ए.करण्यासाठी मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर यांच्यासह सात जणांनी तीन लाखांची खंडणी मागितली मात्र रकमेची पूर्तता न केल्याने आपली फाईलच पालिकेतून लांबवण्यात आल्याने उभयतांविरुद्ध खंडणी व कर्तव्यात कसूर केल्याचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी माजी आमदार संतोष चौधरींनी प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे गुरुवार, 31 मे रोजी मुख्याधिकारी आपल्या सेवेतून सेवानिवृत्त होण्याचा कार्यक्रम एकीकडे असताना चौधरींच्या उपोषणाने भुसावळच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
काय आहे फाईल गहाळ प्रकरण ?
भुसावळ नगरपालिका हद्दीतील सर्वे क्रमांक 103/1 शेतजमीन 24 ऑक्टो बर 2002 रोजी दुय्यम निबंधकांकडे नोंदणी करून विकत घेण्यात आली. ही शेतजमीन अकृषिक करून मिळण्यासाठी 19 मार्च 2009 रोजी फाईल पालिकेत तत्कालीन अभियंता अनिल चौधरी यांच्याकडे जमा केली होती. या जमिनीचे विका शुल्क 8 नोव्हेंबर 2013 रोजी एक लाख 26 हजार 21 रुपये भरण्यातदेखील आले.जमीन अकृषिक झाली वा नाही या संदर्भात विचारणा केल्यानंतर उभयंतांनी आपल्याकडे तीन लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप चौधरींनी केला होता. पालिकेचे मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर, नगरपालिका सेवानिवृत्त अभियंता अनिल भागवत चौधरी, नगरपालिकेचे अभियंता प्रवीण जोंधळे, अभियंता पंकज पन्हाळे, नगरपालिका कर्मचारी राजू नाटकर, विजयसिंग चव्हाण, लेखापाल अख्तरखान युनूसखान या सातही जणांनी पदाचा गैरवापर करून पैशांची मागणी केल्याचा आरोप आहे.
यांचा उपोषणात सहभाग
चौधरी यांच्यासह आमरण उपोषणात गटनेता उल्हास पगारे, दुर्गेश चौधरी, प्रदीप देशमुख, आशिक खान शेर खान, सिकंदर खान, राहुल कैलास बोरसे, सचिन पाटील, रवी सपकाळे, संतोष (दाढी) चौधरी, ललित मराठे, निखील भालेराव यांच्यासह अनेकांचा सहभाग आहे.