भुसावळ मुख्याधिकार्‍यांसह नगराध्यक्षांविरुद्ध गुन्हे दाखल करा

0

डेंग्यूमुळे तिघांचे बळी : जनआधारच्या नगरसेवकांनी केली प्रांतांकडे मागणी

भुसावळ- शहरात डेंग्यूने थैमान माजवल्यानंतरही पालिका प्रशासन कुठलीही ठोस कारवाई करीत नसल्याने तीन जणांचे बळी गेल्याप्रकरणी मुख्याधिकारी, नगराध्यक्ष व आरोग्य अधिकार्‍यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावे, तसेच मृतांच्या वारसांना दहा लाख रुपयांची भरपाई द्यावी, अशी मागणी जनआधारच्या नगरसेवकांनी बुधवारी प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. जनआधारचे गटनेते उल्हास पगारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष नितीन धांडे व नगरसेवकांनी बुधवारी प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांची भेट घेवून शहरातील अनेक प्रश्‍नांबाबत चर्चा केली.

लोकनियुक्त नगराध्यक्षांकडून डोळेझाक
शहरात डेंग्यू डासांची उत्पत्ती वाढविणार्‍या एडीस इजिप्ती डासांची संख्या वाढली आहे. या गंभीर प्रश्नी लोकनियुक्त नगराध्यक्षांनी डोळेझाक केली आहे. यामुळे आता शहराला कोणी वाली नाही. पालिकेच्या रुग्णालयात पुरेशा आरोग्याच्या सूविधा नसल्याने उपचारासाठी नागरीकांना खासगी रुग्णालयामध्ये भटकंती करावी लागत आहे. पालिका अधिकारी तसेच नगराध्यक्षांना वारंवार तोंडी सूचना देवूनही अद्यापपर्यंत कोणतीही ठोस कारवाई घेण्यात आली नाही. याच प्रमुख कारणाने शहरात डेंग्यूमुळे तीन रुग्ण दगावले आहेत. या प्रकरणी संबंधीत मुख्याधिकारी, अधिकारी व नगराध्यक्षांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत. तसेच डेंग्यूमुळे मृत्यू झालेल्या नागरिकांच्या वारसांना पालिकेने दहा लाख रुपयांची मदत करावी, अशी मागणी नगरसेवकांनी प्रांताधिकार्‍यांकडे करण्यात आली. आठवड्याभरात उपाययोजना न झाल्यास आगामी काळात तिव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. यावेळी उल्हास पगारे, नितीन धांडे, राहुल बोरसे, प्रदीप देशमुख, निखील भालेराव, हाजी सलीम पिंजारी, सिकंदर खान, आशिक खान शेरखान, भीमराज कोळी, सचिन पाटील, ललित मराठे, ईकबाल बागवान, इम्तीहाज शेख आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

तर राष्ट्रवादीतर्फे तीव्र आंदोलन
पालिकेने सात दिवसांत शहरातील रस्ते, गटारी, कचरा आदींचे सर्व रखडलेले प्रश्न न सोडविल्यास जनआधार व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन केले जाईल. कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास यास पालिका जबाबदार राहिल तसेच पालिकेने शहरातील सर्व भागांमध्ये धुरळणी व फवारणी करावी. तसेच पालिका रुग्णालयातून गोरगरिब रुग्णांना उपचार मिळावे, असे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे म्हणाले.