भुसावळ युवा सेनेच्या मागणीला यश ; दुष्काळग्रस्त तालुक्यातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

0

भुसावळ- तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांतील दहावी, बारावी तसेच पदवी, पदव्यूत्तर अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ करावे, अशी मागणी 2 नोव्हेंबर रोजी युवा सेनेच्या वतीने भुसावळ प्रांताधिकारी डॉ. श्रीकुमार चिंचकर, शालेय शिक्षण विभागाचे सचिव संजय धारूरकर यांच्याकडे करण्यात आली होती. महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने 5 नोव्हेंबर 2018 रोजी परीपत्रक (क्रमांक 381/तांशी- 4) काढण्यात आले असून त्यात शालेय व महाविद्यालयीन परीक्षा शुल्कात माफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. युवा सेनेच्या मागणीला यश मिळाल्याने विद्यार्थी व पालक वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

जाचक अटींमुळे मिळणार नाही सवलत
ज्या विद्यार्थ्यांचे पालक शहरात प्रत्यक्ष राहतात, नोकरी धंदा करतात परंतु त्यांच्या नावे गावी शेत जमीन आहे अश्या विद्यार्थ्यांना सवलत लागू असणार नाही, असे पत्रकात नमूद आहे मात्र शेतात पीक होत नाही म्हणून शेतकरी, सालदार, रोजंदार मुलांचा शैक्षणिक खर्च भागवण्यासाठी शहरात मजुरी करतो. अश्या विद्यार्थ्यांना सवलत न देणे म्हणजे शासनाचा हा एक प्रकारचा दुजाभाव आहे, असे तालुका युवासेना अधिकारी हेमंत बर्‍हाटे यांनी कळवले आहे.

सरसकट परीक्षा शुल्क माफी द्यावी
शेतकरी वर्गासोबतच सामान्य पालकांना सुद्धा दुष्काळाची झळ बसलेली आहे, सर्व सामान्य पालकांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे, जाचक अटी ठेवून महाराष्ट्र्र शासनाने विद्यार्थी व पालकांच्या परिस्थितीची थट्टा केली आहे, तरी या सर्व अटी शिथिल करून सरसकट परीक्षा शुल्क माफी द्यावी, अशी मागणी शहर युवासेना अधिकारी सूरज पाटील यांनी केली आहे.