भुसावळ- रेल्वे मंत्रालयातर्फे 15 सप्टेंबरपासून ‘स्वच्छ रेल स्वच्छ भारत’ व ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवड्यास प्रारंभ झाला. भुसावळ विभागात विभागीय रेल्वे व्यवस्थापक आर.के.यादव यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता पंधरवड्याचा शुभारंभ अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक मनोज सिन्हा यांच्या हस्ते करण्यात आला. प्रसंगी डीआरएम कार्यालयापासून गांधी चौक, हंबर्डीकर चौक, रेल्वे स्थानकमार्गेे स्वच्छता जनजागृती प्रभात फेरी काढण्यात आली तसेच सर्व अधिकारी, कर्मचारी, स्काऊट आणि गाईडचे स्वयंसेवक, रेल्वे शाळेचे विद्यार्थी व प्रशिक्षणार्थी कर्मचार्यांनी स्वच्छतेची शपथ घेतली. 2 ऑक्टोंबरपर्यंत हा पंधरवडा चालणार असून यात रेल्वे स्थानक परीसर, रेल्वे गाड्या, विश्रामगृह, स्वच्छतागृह, शौचालय, कॅन्टीन आदी ठिकाणी स्वच्छता संदर्भात कामे करण्यात येणार आहे. स्थानकावर स्वच्छतेसाठी रेल्वे शाळेचे विद्यार्थी-विद्यार्थिनी नाटक सादर करून जनजागृती करणार आहे. विविध विभागाच्या कार्यालयासह स्थानके व डेपोत कर्मचारी श्रमदान करणार आहेत.