कंडारी शिवारात वृक्षारोपण झालेच नाही ! शासकीय विभागांची अनास्था उघड
भुसावळ- शासनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीवर भर दिला जात असून शासकीय विभागांनाही वृक्षरोपणाचे उद्दीष्ट दिले जाते मात्र शासकीय विभागाकडून केवळ कागदोपत्री वृक्ष लागवड केली जात असल्याचे समोर येत आहे. यामध्ये भुसावळच्या रेल्वे विभागाने कंडारी शिवारात वृक्षरोपणासाठी स्वतंत्र जागा तयार केली आहे मात्र या जागेवर वृक्षरोपाची लागवड कागदोपत्री केल्याचे दिसून येत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या संदर्भात वरीष्ठ अधिकार्यांनी दखल घेण्याची मागणी होत आहे.
अनेक ठिकाणी कागदोपत्री वृक्षारोपण
शासनाने जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात वृक्षरोपणाचे आवाहन करून वृक्षरोपांची लागवड करण्यासाठी जनजागृतीही केली तसेच शासनाच्या विविध शासकीय विभाग, सेवाभावी संस्थांना सुद्धा वृक्षरोपणाचे आवाहन करण्यात आले होते. यामध्ये विविध सेवाभावी संस्थांनी पुढाकार घेवून वृक्षरोपणाचे कार्य हाती घेेतले आहे मात्र शासकीय विभागाची वृक्षरोपणाची अनास्था समोर येत आहे. बहुतांश ठिकाणी केवळ फोटोसेशन करून कागदोपत्री वृक्षारोपण केल्याचे दिसून येत आहे. यामध्ये रेल्वे विभागाच्या कंडारी शिवारात रेल्वेच्या इंजिनिअरींग विभागातर्फे वृक्षारोपणासाठी जागा आरक्षीत करून या जागेला तारेचे कुंपण केले आहे. प्रत्यक्षात मात्र या जागेवरही एकही वृक्ष लावण्यात आले नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे रेल्वे विभागाच्या या कारभाराबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
आरक्षीत जागेवर काटेरी झुडपे
रेल्वे प्रशासनाने वृक्षरोपणासाठी आरक्षीत केलेल्या या जागेवर हिरव्यागार वृक्षाऐवजी काटेरी झुडुपे वाढली आहेत तसेच वृक्षारोपण असे फलक लावलेल्या फलकही वेलींच्या गराड्यात सापडला आहे. यामुळे रेल्वे प्रशासनाच्या वरीष्ठ अधिकार्यांनी या प्रकाराकडे लक्ष देवून आरक्षीत केलेल्या जागेवर वृक्षारोपण करणे गरजेचे आहे.
घाणीचे साम्राज्य, दखल घेण्याची आवश्यकता
रेल्वे प्रशासनाने वृक्षरोपणासाठी आरक्षीत केलेल्या जागेलगत मोठ्या प्रमाणात अस्वच्छतेमुळे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे या भागातून मार्गक्रमण करतांना नागरीकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत असल्याने रेल्वे प्रशासनाने या भागात स्वच्छता मोहीम राबवून हा परीसर स्वच्छ करणे अत्यावश्यक झाले आहे.