भुसावळ रेल्वे विभागात 12 हजार हॉर्स पॉवर्सचे शक्तीशाली इंजिन दाखल

0

भुसावळ (गणेश वाघ) : भुसावळ रेल्वे विभागात दोन रेल्वे इंजिनाची क्षमता एकाच इंजिनात असलेले शक्तीशाली 12 हजार हॉर्स पॉवरचे रेल्वे इंजिन मंगळवारी दाखल झाले आहे. या इंजिनामुळे रेल्वे मालगाडीचा वेग वाढण्यास मदत होणार आहे. लोडेड गाड्यांना यापूर्वी दोन इंजिनाची गरज भासत असलीतरी आता या एकाच इंजिनामुळे काम भागणार असून तब्बल 15 टक्के उर्जेचीही बचत होणार आहे. दरम्यान, बदलत्या काळाचा वेध घेत रेल्वेतही आमुलाग्र बदल होत असल्याचे हे द्योतक आहे.

डीआरएम यांनी केले परीक्षण
भुसावळ रेल्वे विभागात 12 हजार हॉर्स पॉवरचे शक्तीशाली इलेक्ट्रिक इंजन डब्ल्यूजी- 12 दाखल झाल्यानंतर मंगळवारी डीआरएम विवेककुमार गुप्ता यांनी इंजिनाचे निरीक्षण केले. भुसावळ रेल्वे यार्डात आयोजित छोटेखानी कार्यक्रमा रेल्वेचे वरीष्ठ मंडळ विद्युत अभियंता (टीआरओ) पी.के.भंज, सहाय्यक मंडळ विद्युत अभियंता (टीआरओ) सुदीप रावत व अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, हे शक्तीशालि इंजीन भारतीय रेल्वेच्या मधेपुरा प्लँटमध्ये मेसर्स अलस्टॉम द्वारा निर्मित करण्यात आले आहे.

मालगाड्यांचा वेग वाढणार
लॉकडाऊनच्या काळात देशभरात सर्वत्र मालगाड्यांद्वारे विविध वस्तूंची वाहतूक करण्यात आली मात्र लोडेड गाड्या असल्याने माल वाहतुकीस काहीसा विलंबदेखील झाल्याचे दिसून आले. या पार्श्‍वभूमीवर नव्याने दाखल झालेल्या इंजिनामुळे कोळशाची वाहतूक करणार्‍या मालगाड्यांच्या वेगात मोठी वाढ होणार आहे शिवाय दोन इंजिनाचे काम हे एकच शक्तीशाली इंजिन करणार आहे. थ्री फेज पद्धत्तीवर हे इंजिन आधारीत आहे शिवाय चालकांचा प्रवास आरामदायी होण्यासाठी या इंजिनात वातानुकूलित यंत्रणा (ए.सी.) लावण्यात आली आहे शिवाय इंजिन कॅबमध्ये होणार्‍या संभाषणासाठी रेकॉर्डींगसाठी व्हाईस रेकॉर्डींग सिस्टीमही लावण्यात आले आहे.

15 टक्के उर्जेची बचत
या इंजिनाचे वैशिष्ट्य सांगावयाचे झाल्यास इंजिन सुरू करण्यासाठी खर्च होणारी वीज इंजिनाला ब्रेक लावल्यानंतर पुन्हा विजेचे उत्पादन करून पुन्हा लाईनमध्ये सप्लाय पाठवत असल्याने तब्बल विजेच्या खर्चात 15 टक्के बचत होणार असल्याचे सांगण्यात आले. थ्री फेजमुळे या इंजिनाला अधिक मेंटेनन्सची आवश्यक नसून अधिक वेळ ती लाईनीवर चालण्यासाठी सक्षम ठरणार आहे. दरम्यान, आगामी आठवडेभरात तब्बल शंभर लोको पायलट यांना या संदर्भात प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले.