भुसावळ विधानसभा मतदार संघात आता 307 मतदान केंद्र

0

तालुक्याच्या ग्रामीण भागात नऊ तर शहरात 33 नवीन केंद्रांची निर्मिती

भुसावळ- केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार शहरी भागात ज्या मतदान केंद्रावर एक हजार 400 पेक्षा जास्त तर ग्रामीण भागात एक हजार 200 पेक्षा जास्त मतदार जोडले आहेत, अशा मतदान केंद्रांचे विभाजन करण्याचे आदेश असल्याने भुसावळ तालुक्यात नव्याने 42 मतदान केंद्रांची भर पडली आहे. त्यामुळे तालुक्यातील मतदान केंद्रांची संख्या 265 वरून आता 307 झाली आहे. त्यात शहरातील 33 तर ग्रामीण भागातील 9 वाढीव मतदान केंद्रांचा समावेश आहे. शहरासह तालुक्यात वाढीव मतदान केंद्रांची माहिती राजकीय पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींना व्हावी, तसेच या संदर्भातील हरकतींबाबत तहसील कार्यालयात मंगळवारी सकाळी 11 वाजता बैठक झाली. प्रभारी तहसीलदार संजय तायडे अध्यक्षस्थानी होते. हरकतींसाठी सर्वपक्षीय बैठक बोलावून पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
राष्ट्रीय कॉँग्रेसचे शहराध्यक्ष रवींद्र निकम, रिपाइंचे सुनील अंभोरे, शिवसेनेचे समाधान महाजन, भाजपचे सुधाकर जावळे, जि.प.सदस्य रविंद्र पाटील, आरपीआयचे राजू सूर्यवंशी यांच्यासह इतर पक्ष व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

वाढीव मतदार नवीन केंद्रावर करणार मतदान
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व मतदार याद्या पुनर्रचनेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यात नवीन मतदार नोंदणी, नावे वगळणे, पत्ता बदलणे अशी कामे हाती घेण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील काही प्रभागांतील मतदान केंद्रांचे विभाजन केले. अधिक मतदारांमुळे या केंद्रांवर गोंधळ निर्माण होऊन मतदान प्रक्रियेला विलंब होत असे. त्यामुळे वाढीव मतदारांना नवीन मतदान केंद्रांवर जोडण्यात आले आहे.

मतदान केंद्राचे स्थलांतर
ज्या प्रभागांमध्ये मतदान केंद्रांची अवस्था बिकट झाली आहे, अथवा पडक्या इमारतींमुळे धोका संभवतो अशी मतदान केंद्रे स्थलांतरीत करण्यात आले आहे. जुने तलाठी कार्यालयातील केंद्र तु.स.झोपे शाळेत स्थलांतरीत झाले आहे तर नगरपालिका शाळा क्रमांक 33 मधील बुथ ए.जी.सी. इंग्लिश स्कूलमध्ये हलवण्यात आले आहे. नगरपालिका शाळा क्रमांक 31 मधील बुथ ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये स्थलांतरीत करण्यात आले आहे.

या ठिकणी नवीन मतदान केंद्र
शहरातील शांतीनगर, रेल्वे नॉर्थ परीसर, संभाजीनगर, गडकरीनगर, वरणगाव रोड परिसरात प्रत्येकी 2 नवीन केंद्र वाढवण्यात आले आहेत. तसेच कोळीवाडा, गणेश कॉलनी, महात्मा फुलेनगर, आराधना कॉलनी, भोईनगर, श्रीनगर, भुसावळ हायस्कूल, हंबर्डीकर चौक, मामाजी टॉकीज परिसर, पोस्ट ऑफिस परिसर, नसरवांनी फाईल, आगाखान वाडा, मिल्लतनगर खडकारोड, गुंजाळ कॉलनी, रामदास चाळ, नेमाडे कॉलनी, पाटील नर्सरी, ग्रीनपार्क खडकारोड, काझी प्लॉट, जाम मोहल्ला, शनी मंदीर वार्ड, पंचशीलनगर, चक्रधरनगर वांजोळा रोड, देवानगर, आर.एम.एस कॉलनी, स्वामी समर्थ कॉलनी, गोरक्षण परिसर जामनेररोड तर ग्रामीण भागात साकेगाव, कंडारी, वरणगाव, फुलगाव, साकरी, खडका, कुर्‍हे या ठिकाणी प्रत्येकी नवीन मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली.