भुसावळ विभागातील आठ रेल्वे स्थानकांवर लागणार 440 सीसीटीव्ही कॅमेरे

0

भुसावळ । सर्वसाधारण प्रवासी डब्यांमध्ये रेल्वे प्रवाशांच्या सेवेसाठी चार्जिंगची व्यवस्था करावी, रेल्वेतील अनधिकृत विक्रेत्यांना चाप लावावा, अप्रिय घटना रोखण्यासाठी विविध स्थानकांवर सीसीटीव्ही लावावेत यासह प्रवासी हिताच्या विविध प्रश्‍नांवर रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्यांनी मंगळवारी सूचना मांडल्या. डीआरएम कार्यालयात रेल्वे सल्लागार समिती (डीआरयुसीसी) ची अखेरची बैठक झाली. डीआरएम यांच्या कार्याचे सर्वच सदस्यांनी कौतुक केले.

या स्थानकांवर लागणार सीसीटीव्ही कॅमेरे
भुसावळसह बडनेरा, नाशिक, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, अकोला, मूर्तीजापूर, बडनेरा या आठ रेल्वे स्थानकांवर येत्या सहा महिन्यात उच्च दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार असल्याची माहिती डीआरएम आर.के.यादव यांनी दिली.

सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण, अखेरची बैठक
रेल्वे सल्लागार समितीची मंगळवारी अखेरची बैठक असल्याने अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात बैठक पार पडली. भुसावळचे सदस्य परीक्षीत बर्‍हाटे, अजीत बोहरा, रमेश मकासरे, मलकापूरचे भुरळ, अमरावतीचे रतावा, जळगावचे बियाणी यांच्यासह भुसावळ विभागातील सदस्य उपस्थित होते. सदस्यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ मंगळवारी पूर्ण झाला.

पादचारी पुलाची उभारणी
भुसावळसह नाशिक रेल्वे स्थानकावर लवकरच पादचारी पुलाची उभारणी करण्यात येणार असून भुसावळात नॉर्थ साईडला पीआरएस काऊंटर सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. विविध कामे किती दिवसात पूर्ण होतील याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

भुसावळ विभागातील आठ स्थानकांवर 440 सीसीटीव्ही कॅमेरे बसणार असून शेगाव स्थानकावर होम प्लॅटफार्म लवकरच उभारला जाईल.
-आर.के.यादव, डीआरएम, भुसावळ