हिंदू बांधवांनी दिल्या शुभेच्छा ; भुसावळात हजारो बांधवांच्या उपस्थितीत निघाला जुलूस
भुसावळ- ईस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मुहम्मद (सल्लल्लाहो अलैही वसल्लम) पैगंबर यांची जयंती ईद ए मिलाद म्हणून भुसावळ विभागात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त ठिकठिकाणी मिरवणुका (जुलूस) काढण्यात आल्या. पोलिस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त राखला. हिंदू बांधवांनी मुस्लीम बांधवांना सणानिमित्त शुभेच्छा दिल्या. भुसावळ येथील मिरवणुकीत सुमारे 20 हजारांपेक्षा अधिक मुस्लीम बांधव सहभागी झाले होते.
भुसावळातील मिरवणुकीत शिस्तीचे दर्शन
भुसावळ- शहरातील जाम मोहल्ला भागातील सुन्नी मशिदीपासून मिरवणुकीला सुरूवात झाली. अमरपदी चौक, आगाखान वाडा, शिवाजी नगर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, मॉडर्न रोड, जामा मशिदमार्गे मिरवणुकीत उर्दू शाळा क्रमांक तीनजवळ आल्यानंतर मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. सुमारे 20 हजारांपेक्षा अधिक समाजबांधव या मिरवणुकीत सहभागी झाले तर शिस्तबद्धरीत्या काढण्यात आलेल्या मिरवणुकीने लक्ष वेधले. विशेष म्हणजे मिरवणूक आटोपल्यानंतर या मार्गावरील कचरादेखील लागलीच हटवण्यात आला. माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे, आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, माजी आमदार संतोष चौधरी, माजी आमदार नीळकठ फालक, भाजपा संघटन सरचिटणीस प्रा.सुनील नेवे, डीवायएसपी गजानन राठोड यांच्यासह लोकप्रतिनिधी तसेच विविध संस्था, संघटनांच्या पदाधिकार्यांनी मुस्लीम बांधवांना शुभेच्छा दिल्या. आराकिन अंजुमन अहले सुन्नत वल जमातच्या पदाधिकार्यांनी परीश्रम घेतले.
मुक्ताईनगरात जलसा मिरवणुकीने वेधले लक्ष
मुक्ताईनगर- सुन्नी मनियार मस्जिद ट्रस्टच्या वतीने पैगंबर महंमद यांची जयंती साजरी करण्यात आली. त्या निमित्त सुन्नी मणियार मस्जिद ट्रस्टच्या परीसरात मोहम्मद पैगंबर महंमद यांची जयंतीनिमित्त मोहम्मद पैगंबर यांच्या आत्मचरित्र बाबत लहान मुलांच्या जलसाचे आयोजन करण्यात आले. त्यात एकुण 53 मुलां-मुलीनी सहभाग घेतला होते. 21 रोजी ईद मिलादुन नबीनिमित्त भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीला सुन्नी मणियार मस्जिदपासून सुरुवात केली. इदगाह नगर, काजीपुरा मार्गाने गांधी नगर ते परीवर्तन चौक ते परत मणियार मस्जिदजवळ मिरवणुकीचा समारोप झाला. रॅलीत प्रभाग क्र.11 चे नगरसेवक मस्तान कुरैशी यांच्यातर्फे खीरचे वाटप करण्यात आली. काजीपुरामधील मुलांना खजूर, आईस्क्रीम, केळी, फराळ, चॉकलेटचे वाटप करण्यात आले. तसेच परीवर्तन चौकमधील माजी ग्रामपंचायत सदस्य रफिक मेंबर यांच्यातर्फे खीरचे वाटप करण्यात आले होते.
हिंदू बांधवांनी दिल्या शुभेच्छा
ईद मिलादून नबीची रॅलीमध्ये मणियार मस्जिदचे इमाम हाफिज इकबाल, मणियार मस्जिदचे मुतवल्ली कलीम मणियार, मणियार बिरादरीचे तालुकाध्यक्ष हकीम आर चौधरी, अ.रफिक मजिद, मुशीर मणियार, रफिक चौधरी, आमद ठेकेदार, समद ठेकेदार, शिवसेना जिल्हा संघटक अफसर खान आदी उपस्थित होते. रॅलीमध्ये मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी अॅड.रविंद्र भैय्या पाटील, विनोद तराळ, वसीम खान, ईश्वर रहाणे आदी उपस्थित होते.