भुसावळ विभागात भारत बंदला संमिश्र प्रतिसाद

0

पेट्रोल पंप व्यावसायीकांनी पाळला बंद : बसेस खाजगी वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांचे हाल

भुसावळ- इंधन दरवाढीसह विविध मागण्यांसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी, मनसे व विरोधी पक्षांनी सोमवारी भारत बंदची हाक दिली होती. या बंदला भुसावळ विभागात संमिश्र प्रतिसाद मिळाला. दुपारपर्यंत व्यापारी पेठा, पेट्रोल पंप कडकडीत बंद राहिले तर दुपारनंतर व्यापार्‍यांनी प्रतिष्ठाने उघडली. बंददरम्यान नेहमीच आंदोलकांच्या रडारवर बसेस असल्याने विभागातील सर्व आगारांनी बसेस दुपारपर्यंत बंद ठेवल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले तर ठिकठिकाणी दुपारी तीन वाजेच्या नंतर बस वाहतूक पूर्व सुरू करण्यात आली.

भुसावळात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
भुसावळ- भारत बंदला शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. काँग्रेस-राष्ट्रवादीसह मनसे, पीआरपीचे (कवाडे गट) पदाधिकारी बंदमध्ये सहभागी झाले. सुरुवातीला महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. काही व्यापार्‍यांनी दुकानांचे अर्धे शटर उघडे ठेवल्याने पदाधिकार्‍यांनी शांततेच्या मार्गाने प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. शहरातील सराफा बाजार, मॉडर्न रोड, आठवडे बाजार भागात कडकडीत दुकाने बंद ठेवण्यात आली. अत्यावश्यक सेवा असलेली मेडिकल दुकाने मात्र सुरू होती.

यांचा आंदोलनात सहभाग
काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष मुन्वर खान, काँग्रेस शहराध्यक्ष रवींद्र निकम, सरचिटणीस रहिम कुरेशी, अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष जे.बी.कोटेचा, काँग्रेस सेवा दलाचे मनीष नेमाडे, डॉ.सुवर्णा गाढेकर, युवक तालुकाध्यक्ष इम्रान खान, जिल्हा परीषदेचे माजी सदस्य प्रा.संदानशीव, मेहबूब खान, फकरूद्दीन बोहरी, सलीम गवळी, अनिता खरारे, महिला शहराध्यक्ष कल्पना तायडे, भीमराव तायडे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष तथा जिल्हा परीषद सदस्य रवींद्र पाटील, शेख पापा शेख कालू, सामाजिक न्याय विभागाचे मुन्ना सोनवणे, मनसेच्या मयुरी पाटील, रीना साळवी, विनोद पाठक, पीआरपीचे राजू डोंगरदिवे यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते बंदच्या आंदोलनात सहभागी झाले.

एस.टी.ठप्प ; प्रवाशांचे हाल
भारत बंदमुळे भुसावळ आगाराने सकाळपासून वाहतूक बंद ठेवली तर कमी व लांब अंतराच्या तब्बल 53 फेर्‍या रद्द करण्यात आल्याने आगाराला लाखोंचा फटका बसला. दुपारी तीन वाजेच्या सुमारास बस वाहतूक पूर्ववत करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. बसस्थानकातून वरणगावस, जळगाव, मुक्ताईनगर, बोदवड आदी भागातून प्रवाशांची वाहतूक केली जात असलीतरी बंदच्या आवाहनानंतर व्यावसायीकही माघारी परतले.

मुक्ताईनगरात कडकडीत बंद
मुक्ताईनगर- काँग्रेस पक्षासहप्रमुख विरोधी पक्षांनी मुक्ताईनगर शहरात कडकडीत बंद पाळला. व्यापारी व सर्वसामान्य नागरीकांनी देखील विरोधी पक्षांच्या या बंदला उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला. सकाळपासूनच व्यापार्‍यांनी दुकाने उघडली नाही. मुक्ताईनगरातील पेट्रोल पंप चालकांसह गॅस एजन्सी चालकांनी बंद पाळल. सोमवारी सकाळी सात वाजेपासूनच मुक्ताईनगर शहरातील प्रवर्तन चौकात काँग्रेस पक्षातर्फे मंडप टाकून निषेध आंदोलन करण्यात आले. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत काँग्रेस-राष्ट्रवादीने आपल्या आंदोलनाला सुरुवात केली. व्यापार्‍यांनीदेखील उत्स्फूर्तपणे दुकाने बंद ठेवली वाहने मात्र सुरळीत चालू होती. दुपार चार वाजेच्या सुमारास तीनही पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी तहसीलदारांना निवेदन दिले.

यांचा आंदोलनात सहभाग
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे या विरोधी पक्षांच्या आंदोलनात काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस डॉ.जगदीश पाटील, तालुकाध्यक्ष आत्माराम जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष यु.डी.पाटील, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष राजू सांगलकर, काँग्रेस पक्षाचे जिल्हा सचिव आसीफ खान, माजी उपसभापती अनंतराव देशमुख, राष्ट्रवादीचे विधानसभा मतदारसंघ क्षेत्रप्रमुख ईश्वर राहणे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष नीरज बोराखडे, प्रा.पवन खुरपडे, अ‍ॅड.अरविंद गोसावी, गवई शकील आजाद, अशोक नाईक, मारुती सुरडकर, संजय धामोळे, अरुण कांडेलकर, पंडित तायडे, मुक्तार रब्बानी, मधुकर भाई, शेख रिजवान, बशीर शहा, नसीर शेख ईस्माईल, शेख शकूर, रावेर तालुका मराठा समाज मंडळाचे कडू तुकाराम पाटील, वामनराव पाटील, संतोष महाजन यांच्यासह काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व मनसे या पक्षांचे विरोधी पक्ष नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावल शहद बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
यावल- पेट्रोल-डिझेलचे वाढते दर, महागाई, रुपयाचे अवमूल्यन, विविध घोटाळे आदी विषयांना घेवून शहर बंदची हाक देण्यात आली होती. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व समान विचारसरणी असलेले पक्षाच्या ज्येष्ठ नेते मंडळींनी भारत बंदचे आवाहन केल्यानंतर शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले. यावल शहरात माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या नेतृत्वाखाली यावल शहर बंद करण्यात आले. शांततेच्या मार्गाने व्यापार्‍यांना आवाहन करण्यात आले. ज्येष्ठ पदाधिकारी हाजी शब्बीरखान शेठ, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रभाकर सोनवणे, भगतसिंग पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रा.मुकेश येवले, देवकांत पाटील, प्रवीण घोडके, अमोल गरुड, अमोल भिरुड, शहराध्यक्ष कदीरखान, मनसे शहराध्यक्ष चेतन आढळकर, हाजी गुलाम रसूल शेख, मुकेश नन्नवरे, बोदडे नाना अलिम शेख, हाजी गफ्फार शहा, राजू पिंजारी, नईम भाई, अल्ताफ शेख, शेखर तायडे, राज महंमद, विवेक सोनार, मुस्तफा भाई आदी सहभागी झाले.

वरणगावात सरकारच्या विरोधात निषेध
वरणगाव- देशात जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ दिवसेंदिवस वाढत चालली असल्याने भाजप सरकारच्या विरोधात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने महागाईचा निषेध करून वरणगाव शहर बंद ठेवण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक राजेंद्र चौधरी, रवींद्र सोनवणे, समाधान चौधरी, पंकज पाटील, ज्ञानेश्वर पाटील, अनिल पाटील, काँग्रेस पार्टीचे शैलेश बोदडे, दीपक मराठे, राजेंद्र पालिकर, अशफाक काझी, राजेश चौधरी, जयंत सुरपाटने , मनोज देशमुख, राजेश काकाणी, गजानन वंजारी, सीताराम गुमळकर आदी कार्यकते उपस्थित होते.