भुसावळ- भुसावळ विभागात वेगवेगळ्या घटनेत तीन जणांचा दुर्दैवीरीत्या मृत्यू झाला. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दोन जणांचा तापी पात्रात बुडाल्याने तर एकाचा रेल्वेतून पडल्याने मृत्यू झाला.
रेल्वेतून पडल्याने अनोळखीचा मृत्यू
भुसावळ- साकेगाव शिवारातील रेल्वे डाऊन लाईनवर 25 वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला. या ईसमाचा रेल्वेतून पडल्याने मृत्यू झाला की त्याने आत्महत्या केली? याबाबत नेमके कारण कळू शकलेले नाही मात्र घटनास्थळी तालुका पोलिसांना धडावेगळी मान मिळाल्याने हा आत्महत्येचा प्रकार असावा, अशीदेखील शक्यता आहे. डाऊन लाईनवरील खांबा क्रमांक 439/3 जवळ मृतदेह आढळला. या प्रकरणी तालुका पोलिसात उपप्रबंधक हितेंद्र गणपत आव्हाड यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास उपनिरीक्षक सुरेश वैद्य करीत आहेत.
तापी पात्रात एकाची आत्महत्या तर दुसर्याचा मृतदेह आढळला
मुक्ताईनगर- तालुक्यातील चांगदेव येथील तापी पात्रात 30 ते 35 वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला. या इसमाची अद्याप ओळख पटू शकलेली नाही. मुक्ताईनगर पोलिसात शिक्षक भूषण विनोद चौधरी (30) यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास उपनिरीक्षक कैलास भारसके करीत आहेत. दुसर्या घटनेत तालखेडा येथील तापी पात्रात प्रतप दिलीप इंगळे (32, रा.वायला) या ईसमाचा मृतदेह आढळला. त्यांनी चार दिवसांपूर्वी आत्महत्या केल्याचा संशय असून मृतदेह पाण्यात राहिल्याने कुजल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. समाधान गवळी (62, तालखेडा) यांनी मुक्ताईनगर पोलिसात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास एएसआय माणिक निकम करीत आहेत.