भुसावळ विभागात वॉश आऊट ; लाखोंची गावठी दारू उद्ध्वस्त

0

जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या अल्टीमेटमनंतर पोलिस प्रशासनाकडून धडक कारवाया ; जुगार्‍यांवरही पोलिसांची वक्रदृष्टी

भुसावळ- जिल्हा पोलिस अधीक्षक दत्ता शिंदे यांनी अवैध धंदे पूर्णपणे बंद करण्याचे आदेश दिल्यानंतरही चोरी-छुपे धंदे सुरू असल्याने जिल्ह्यातील तीन पोलिस ठाण्यातील निरीक्षकांची उचलबांगडी करण्यात आली तर अधिकार्‍यांच्या मर्जीतील खास 75 पोलिस कर्मचार्‍यांना विशेष नवचैतन्य कोर्ससाठी जळगाव मुख्यालयात जमा करण्यात आल्यानंतर पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली. कारवाईची टांगती तलवार आल्यानंतर अधिकार्‍यांनी आपापल्या हद्दीतील अवैध धंद्यांवर कारवाईचे आदेश दिल्यानंतर भुसावळ विभागात ठिकठिकाणी अवैधरीत्या गाळली जाणार्‍या गावठी दारूच्या हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या तसेच खुलेआम चालणार्‍या जुगार्‍यांवर कारवाई केल्याने अवैध धंदे चालकांमध्ये खळबळ उडाली आहे. अवैध धंद्यांचे आता समूळ उच्चाटन करावे, अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे.

किन्ही शिवारातील अवैध दारूभट्टी उद्ध्वस्त
भुसावळ- तालुक्यातील किन्ही शिवारात अवैधरीत्या सुरू असलेली गावठी दारूची भट्टी पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सोमवारी सकाळी 9.15 वाजेच्या सुमारास उद्ध्वस्त केली. युनूस गवळी (शिवपूर कन्हाळा) हा आरोपी मात्र पसार होण्यात यशस्वी झाला. पोलिस पथकाने सव्वा लाख रुपये किंमतीची 25 ड्रममधील गुळ व नवसागर मिश्रीत गावठी दारू उद्ध्वस्त केली तसेच दोन हजार 500 रुपये किंमतीचा पत्री ड्रम जप्त केला. या प्रकरणी संकेत झांबरे यांनी तालुका पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी युनूस गवळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. शहर, बाजारपेठ व तालुका पोलिसांना सोबत घेत पोलिस उपअधीक्षकांनी केलेल्या कारवाईने अवैध धंदे चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.

साकळीनजीक जुगार अड्ड्यावर धाड ; चौघांना अटक, पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त
यावल- तालुक्यातील साकळी गावाच्या शेती शिवारात चालणार्‍या जुगार अड्ड्यावर अप्पर पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांच्या पथकाने छापा टाकत तब्बल दोन लाख 66 हजार 170 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला तर कारवाईत चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून पाच जण पसार झाले. ही कारवाई रविवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास साकळी गावापासून तब्बल पाच किलोमीटर लांब शेतात करण्यात आली. संपूर्ण जिल्ह्यात अवैध धंद्याविरुद्ध कठोर कारवाईची मोहीम सुरू आहे तर अवैध धंदे बंद असल्याने साकळीतील काहींनी गावापासून पाच किलोमीटर लांब अंतरावर असलेल्या पंडित रामदास पाटील यांच्या शेताजवळ जुगार अड्डा सुरू केला होता व त्याची गोपनीय माहिती अपर पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांना मिळाली होती तेव्हा रविवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास त्यांचे पथक या भागात दाखल झाले व साकळी शिवारातील पंडित रामदास पाटील यांच्या शेताजवळील आंब्याच्या झाडाखाली झन्ना-मन्ना जुगार खेळताना त्यांना नऊ जण आढळून आले. पोलिसांना पाहून त्यातील पाच जणांनी पळ काढला तर भीमराव पंडित पाटील, हेमचंद्र उर्फ राजू जोगी, मोहसीन शेख कबीर, उमर अली मोहम्मद कच्छी या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले तर किसन सीताराम महाजन, सैय्यद अकबर सय्यद रज्जाक, जुम्मा पठाण, दशरत इंगळे, अरुण बळीराम कोळी हे पाच जण फरार झाले तर या जुगार अड्ड्यावर 62 हजार 170 रुपयांच्या रोकडसह चार दुचाकी वाहन व चार मोबाईल असा एकूण दोन लाख 66 हजार 170 रुपयाचा मुद्देमाल या पथकाने हस्तगत केला. यावल पोलिसात विजय नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळात जुगाराचा डाव उधळला ; आठ आरोपींना अटक
भुसावळ- शहरातील गौतम नगर भागात नाल्याजवळ सार्वजनिक जागी झन्ना-मन्ना नावाचा 52 पत्यांचा जुगाराचा डाव सुरू असल्याची गोपनीय माहिती भुसावळचे पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांना मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईच्या सूचना केल्यानंतर बाजारपेठ पोलिसांनी धाड टाकत आठ जुगार्‍यांच्या मुसक्या आवळत पत्ते, जुगारासह एक हजार 500 रुपयांची रोकड जप्त केली. या प्रकरणी दीपक वामन निकम (40), सागर पंडीत खंडेराव (30), विजय महेंद्र तायडे (28), सचिन दशरथ नरवाडे (30), नितीन सुरेश मोरे (40), सुरज किशोर वेलकर (28), राजेश शंकर मोरे (36), भरत उत्तम नरवाडे (36, सर्व रा.गौतम नगर, भुसावळ) यांना अटक करण्यात आली. ही कारवाई बाजारपेठ पोलिस निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकातील सहाय्यक फौजदार अंबादास पाथरवट, पोलिस नाईक सुनील थोरात, दीपक जाधव, कृष्णा देशमुख, निलेश बाविस्कर, प्रशांत चव्हाण, योगेश माळी, राहुल चौधरी, संदीप परदेशी आदींनी केली. तपास पोलिस नाईक दीपक जाधव करीत आहेत.

रावेर शहरात ढाब्यावरून देशी-विदेशी दारू जप्त
रावेर- शहराजवळील जय भोले ढाब्यावर अवैधरीत्या देशी-विदेशी दारूची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर फैजपूरचे पोलिस उपअधीक्षक राजेंद्र रायसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केलेल्या कारवाई नऊ हजार 611 रुपये किंमतीची देशी-विदेशी दारू जप्त करण्यात आली. संशयीत आरोपी आरोपी प्रवीण गोविंद पाटील (रा.केर्‍हाळा, ता.रावेर) यास अटक करण्यात आली. ही कारवाई पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी पाळदे, हवालदार जितेंद्र पाटील, हवालदार ईस्माईल शेख, पोलिस नाईक सोनी, नाईक तायडे, कॉन्स्टेबल मंदार पाटील, कॉन्स्टेबल विकास पहुरकर, कॉन्स्टेबल संदीप पाटील यांच्या पथकाने केली. आरोपीविरुद्ध रावेर पोलिसात गुन्हा दाखल असून तपास हवालदार शे. ईस्माईल हे करीत आहेत.

सातपुडा पर्वत रांगेतील गावांमध्येही धाड
यावल- तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगेत असलेल्या सावखेडा शिवारात व किनगाव येथे गावठी हातभट्टी दारूच्या अड्ड्यांवर पोलिस उपअधीक्षक राजेंद्र रायसिंग, यावल पोलिस निरीक्षक दत्तात्रय परदेशी यांनी छापा टाकत त्या उद्ध्वस्त केल्या. सलीम तडवी यास अटक करण्यात आली असून त्याच्या ताब्यातून 25 हजारांची गावठी दारू जप्त करण्यात आली.