भुसावळ शहरातील अतिक्रमणावर गुरुवारी हटणार !

350 व्यावसायीकांना पालिकेने बजावली नोटीस : व्यावसायीकांमध्ये खळबळ

भुसावळ : शहरातील विविध भागातील 350 पेक्षा जास्त अतिक्रमण केलेल्या व्यावसायीकांना पालिकेने नोटीस बजावत स्वत:हून अतिक्रमण काढून घेण्याचे बजावले असून अन्यथा गुरुवारी कारवाईचा इशारा दिल्याने व्यावसायीकांमध्ये खळबळ उडाली आहे.

या भागात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण
शहरातील वाहतुकीचे प्रमुख मार्ग, बाजारपेठा, व्यापारी संकुले, शैक्षणिक संस्थांच्या परिसरात जागोजागी अतिक्रमण वाढले आहे. यामुळे वाहतुकीला अडथळे येतात. त्यातून दररोज किरकोळ वाद, लहान-मोठे अपघात देखील होतात. यामुळे त्रस्त भुसावळकरांनी पालिकेने शहरातील अतिक्रमण काढावे, अशी मागणी केली होती. त्याची दखल घेत पालिका प्रशासनाने अतिक्रमण केलेल्या 350 पेक्षा जास्त व्यावसायीकांना नोटीस बजावून खळबळ उडवून दिली. गांधी पुतळ्यासमोरील यावल रोडवरील विक्रेत्यांना देखील अतिक्रमित टपर्‍या हटवून रस्ते वाहतुकीला मोकळे करावे, अशा सूचना देण्यात आल्या. जळगाव रोड, जामनेर रोडसह अन्य भागातील अतिक्रमण देखील काढण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी दिली. वारंवार सूचना देऊनही अनेक व्यावसायिक ऐकत नाही. त्यामुळे कारवाईशिवाय पर्याय नसल्याचे ते म्हणाले.