भुसावळ शहरातील ऐतिहासिक सेंट पॉल चर्च

0

शहरात पवित्र नाताळ पर्वास सुरुवात : 1927 सालात सी.सी.लिंपस यांनी केली उभारणी

भुसावळ- शहरात पवित्र नाताळ पर्वाला सुरुवात झाली असून विविध कार्यक्रम होत आहेत. आरपीडी रस्ता आणि रेल्वे दवाखान्या समोरील ‘सेंट पॉल’चर्च (इंग्रजी, मराठी) ला तब्बल दीडशे वर्षांचा इतिहास आहे. ब्रिटिश अधिकारी सी.सी.लिंपस यांनी 1927 साली या चर्चची उभारणी केली होती. सेंट पॉल यांच्या 25 जानेवारी या परीवर्तन दिनी या चर्चचा शुभारंभ लॉर्ड बिशप ऑफ मुंबईचे राईट रेव्ह.एडवीन जेम्स पॅलमर यांच्याहस्ते झाला. या चर्चचे प्रीस्ट इंन्चार्ज रेव्ह.ओ. एस.बूथ हे होते तर 1927 ते आज पर्यंत 18 धर्मगुरुंनी चर्चमध्ये सेवा बजावल्याचे सांगण्यात आले.

ऐतिहासिक अँग्लीकन
मराठवाडा धर्मप्रांतातील कार्यक्षेत्रातील ही एक ऐतिहासिक अँग्लीकन चर्च म्हणून या चर्चची ओळख आहे. या चर्चची सभासद संख्या सुमारे 600 आहे. या चर्चची रचना ही पवित्र बायबल शास्त्रानुसार असून चर्च सुमारे 100 बाय 30 चौ.मीटर आहे. बांधणी संपूर्णपणे दगडात असून चर्चची आतील रचना ब्रिटिशकालीन आहे. यात भाविकांना बसण्यासाठी सागवानी बाक आहेत. चर्चच्या धर्मगुरुंसाठी उभारण्यात आलेले ‘पूलपीट’ (व्यासपीठ) वेगळ्या बांधणीचे असून त्यालादेखील सुमारे 150 वर्षे झाली आहेत.

ब्रिटिशकालीन बेल (घंटा)
या चर्चची घटना (बेल) हीदेखील ब्रिटिशकालीन आहे. तिचे वजन सुमारे दोन क्विंटल आहे. ती पितळी आणि कांस्य या धातूने तयार करण्यात आली आहे. चर्च परीसरातच चर्चच्या सेवकांसाठी निवासस्थानाची सोय करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी देखणा रंगमंच आहे. लहान मुलांसाठी संडे स्कूलची सोय आहे. प्रशस्त प्रांगण आहे. चांगली बाग विकसित करण्यात आली आहे. या चर्चमधील प्रभू भोजनाची भांडी पितळी, चांदीची व ब्रिटिशकालीन आहेत.

धर्मगुरुंसाठी ‘वेस्टी’ स्वतंत्र कक्ष
सेंट पॉल चर्चमध्ये चर्चचे धर्मगुरु यांच्यासाठी स्वतंत्र ‘वेस्टी’ कक्ष आहे. या कक्षात धर्मगुरु यांची बसण्याची व्यवस्था, धार्मिक विधीच्यावेळी ते वापरत असलेले वस्त्र, प्रभू भोजनाचे साहित्य ठेवण्याची सोय आहे. याच वेस्टीमध्ये धर्मगुरुंना भेटून प्रार्थना करण्याची मुभा आहे.