भुसावळ : शहरात पालिकेच्या माध्यमातून सुरू असलेली डांबरीकरणाची कामे अत्यंत निकृष्ट पद्धत्तीने हेात असून ठेकेदार विनय बढे हे निकृष्ट खडी व डांबर वापरून ही कामे करीत असल्याने हे रस्ते जास्त काळ टिकणार नाहीत त्यामुळे डांबर व खडीच्या बिलांचीही चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष व नगरसेवक नितीन धांडे यांनी पालिका प्रशासन व सत्ताधार्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पावसाळ्यापूर्वीच रस्ते उखडण्यास सुरूवात
कंत्राटदार विनय बढे यांनी या कामांसाठी खडी व डांबर कोठून आणले, त्या संदर्भातील सर्व बिलांची चौकशी करावी, अशी मागणी शहराध्यक्ष नितीन धांडे यांनी केली असून शहरातील कामांची गुणवत्ता सुधारावी तसेच ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी उपनगराध्यक्ष प्रमोद नेमाडे व उपमुख्याधिकारी महेंद्र कातोरे यांच्याकडे बुधवारी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी नगरसेवक नितीन धांडे, नगरसेवक उल्हास पगारे व पदाधिकार्यांनी शांती नगरातील कामांची पाहणीही केली.
तक्रारीत तथ्य आढळल्यास कारवाई : मुख्याधिकारी
मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी सांगितले की, या तक्रारीच्या अनुषंगाने रस्त्यांच्या कामांची पाहणी केली जाईल तसेच तक्रारीत तथ्य आढळल्यास संबंधित ठेकेदारावर कारवाई केली जाईल.
मंजूर नसलेल्या कामांसाठी नगरसेवकाचा दबाव : कंत्राटदार बढे
तक्रारदार नितीन धांडे यांनी त्यांच्या वॉर्डात मंजूर नसलेल्या रस्त्यांची कामे करण्यासाठी आपणावर दबाव टाकला मात्र कामे करण्यास नकार दिल्याने धांडे यांनी आकसबुद्धीनेच तक्रार केली आहे. निविदा मिळण्याची प्रक्रिया ऑनलाईन असते शिवाय मंजूर असलेल्या इस्टिमेटनुसार कामे केली जात असून तक्रारीत कुठलेही तथ्य नाही, असे कंत्राटदार विनय बढे म्हणाले.