पालिकेची बेफिकीरी : घरांमध्ये पाणी शिरण्याची नागरिकांना भीती
भुसावळ- पावसाळा उंबरठ्यावर आला असतानाही नाले सफाई करण्याबाबत पालिकेचे नियोजन दिसून येत नाही़ हवामान खात्याच्या वृत्तानुसार 18 जूनपासून जोरदार पाऊस होणार असल्याने यापार्श्वभूमीवर नाल्याकाठच्या घरांमध्ये पाणी शिरल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे़ शहरातून गेलेल्या बलबल काशी नाल्यात मोठ्या प्रमाणावर गाळ अडकला आहे त्यासोबतच प्लॉस्टिकच्या पिशव्या, खराब कपडे, प्लॅस्टिक ग्लास यासह विविध प्रकारचा कचरा अडकल्याने मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरल्याने आरोग्य धोक्यात आले आहे़ मे महिन्याच्य प्रारंभी म्हणजे पावसाळ्यापूर्वीच नाल्यांची सफाई करण्याची गरज होती मात्र नगरपालिका प्रशासनाचे ठोस धोरण नसल्याने जून महिन्याला सुरुवात होवून सहा दिवस उलटले आहेत तर 12 दिवसानंतर पावसाचे आगमन होणार असल्याचा हवामान खात्याने अंदाज वतर्वला आहे. या कालावधीच्या आतच शहरातील नाल्यांची सफाई होणे गरजेचे आहे़
पावसाच्या पाण्यामुळे पुराचा धोका
शहरात मुसळधार पाऊस झाल्यास नाल्यांना पूर येण्याची भीती व्यक्त होत आहे़ काही वर्षांपूर्वी पुरामुळे नाल्याकाठच्या घरांमध्ये पाणी शिरल्याची आठवण जाणकार नागरीक आजही सांगतात़ या पार्श्वभूमीवर पालिकेने सफाई अभियान तातडीने राबवणे गरजेचे आहे़ खडका रोडभागातून गेलेल्या मोठ्या गटारीत (नाला) मोठ्या प्रमाणावर घाण साचली आहे़ मध्यंतरी पालिकेच्या आरोग्य विभागाला जाग आल्याने छोट्या नाल्यांची स्वच्छता झाली मात्रतीही थातूर-मातूर पद्धत्तीने करण्यात आल्याने पुन्हा ’जैसे थे’ स्थिती निर्माण झाली आहे़ पालिका प्रशासनाने तातडीने दखल घेण्याची मागणी होत आहे़