भुसावळ शहरात शिवसेनेची गांधीगिरी ; राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांना मुरूमाचा ‘मुलामा’

0

राज्यातील महामार्गावरील खड्डे डिसेंबर 2017 पर्यंत बुजवण्याची वल्गना करणार्‍या सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांची शिवसेनेने उडवली खिल्ली

भुसावळ- नागपूर-मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरील वाढत्या खड्ड्यांमुळे होणारे अपघात पाहता शिवसेनेने गांधीगिरी करीत व महामार्ग प्राधिकरणाचे डोळे उघडण्यासाठी मुरूमाद्वारे खड्डे बुजवले. राज्यातील 93 हजार किलोमीटरचे रस्ते 15 डिसेंबरपर्यंत खड्डेमुक्त करण्यात येणार आहेत, त्याची सर्व तयारी सुरू आहे, अशी माहिती 31 ऑक्टोबर 2017 रोजी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली होती मात्र प्रत्यक्षात त्यानंतरही परीस्थिती ‘जैसे थे’ राहिल्याने शिवसेना पदाधिकार्‍यांनी पालकमंत्र्यांच्या वक्तव्याची प्रसंगी खिल्ली उडवली. मुरूमाने का असेना तात्पुरता खड्डे बुजवण्यात आल्याने महामार्गावरील वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले.

वाहनधारकांना दिलासा ; खड्ड्यांना मुरूमाचा मुलामा
महामार्ग चौपदरीकरणास प्रारंभ झाल्यामुळे रस्त्यावरील वाहतूक वाढली असून खड्डयांची संख्या वाढली आहे शिवाय त्यासोबतच अपघातही वाढल्याने खड्ड्यांबाबतच्या तक्रारी शिवसेना पदाधिकार्‍यांकडे आल्या होत्या. सार्वजनिक बांधकाम विभागासह महामार्ग प्राधिकरणाचे डोळे उघडण्यासाठी बुधवारी शिवसेना शहर प्रमुख बबलू बर्‍हाटे यांच्या नेतृत्वात शिवसेना तालुका संघटक प्रा.धीरज पाटील, शहर प्रमुख बबलू बर्‍हाटे, युवासेना शहर प्रमुख सुरज पाटील, उपशहर प्रमुख धनराज ठाकूर, उपशहर संघटक नबी पटेल, दिव्यांग सेना तालुका प्रमुख फिरोज तडवी, शिक्षकसेना तालुका प्रमुख अतुल शेटे, तालुका प्रसिद्धी प्रमुख गोकुळ बाविस्कर, शरद जोहरे, निलेश हिवरे, ललित सैतवाल, विक्की चव्हाण यांनी रेल्वे पुलावरील जीवघेणे खड्डे मुरूमाने बुजवले.

कोट्यवधींचा निधी गेला कुठे ?
रेल्वेचा पूल धोकेदायक आहे, त्यावरून वाहने सावकाश चालवा असा फलक येथे लावण्यात आला असून पुलाचे आयुष्य जर संपलेले असेल तर त्यासाठी आतापर्यंत काहीच उपाय योजना का करण्यात आल्या नाहीत? असा प्रश्‍न उपस्थित करून सरकारकडून खड्डेमुक्तीची केलेली घोषणा व महामार्गावरील खड्डेमुक्तीसाठी राज्य सरकारने कोट्यवधी रुपये मंजूर केल्याचे सांगितले असताना खड्डे का बुजले गेले नाहीत वा हा निधी गेला कुठे ? असा प्रश्‍न पदाधिकार्‍यांनी उपस्थित केला. दरम्यान, श्रमदान करून प्रवाशांसाठी हा मार्ग सुखकर व्हावा, या दृष्टिकोनातून 21 नोव्हेंबर रोजी मोहीम हाती घेतली आहे असे शहर प्रमुख बबलू बर्‍हाटे यांनी सांगितले.